प्रभात वृत्तसेवा पुणे – ग्रंथ हे माणसाचे उत्तम मित्र असून, ते जीवनात आनंद आणि सुखाचा मार्ग दाखवतात. ग्रंथांशिवाय ज्ञानाला पर्याय नाही. पुणे शहर हे लवकरच पुस्तकांची पंढरी ठरणार असल्याचे मत सातारा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी शनिवारी व्यक्त केले.राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, डीईएसचे अध्यक्ष प्रमोद रावत, एनबीटीचे अध्यक्ष मिलिंद मराठे, उद्योजक डॉ. किरण ठाकूर, मुख्य संयोजक राजेश पांडे, सोमनाथ पाटील, प्रसेनजित फडणवीस, बागेश्री मंठाळकर उपस्थित होते. विश्वास पाटील यांनी मोबाईलवरील वाढत्या वेळेबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, प्रत्येक भारतीय माणूस दिवसातील सहा तास मोबाईलवर घालवत आहे, ही गंभीर बाब आहे. या महोत्सवामुळे पुण्यात ग्रंथांची पेठ उभी राहत आहे आणि संयोजक नव्या युगात ग्रंथांवर प्रेम करण्याची पालखी खांद्यावर घेऊन देशाच्या कानाकोपऱ्यात उत्तमोत्तम विचार पोहोचवण्याचे काम करत आहेत. राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांचे कौतुक करत महोत्सवाने स्वतःची ओळख निर्माण केल्याचे सांगितले. गेल्या दोन महोत्सवांच्या शेवटी होणारी गर्दी यंदा पहिल्याच दिवशी झाली. पुणेकर आतुरतेने या महोत्सवाची वाट पाहतात, हे स्पष्ट झाल्याचे त्यांनी नमूद केले. एनबीटीचे अध्यक्ष मिलिंद मराठे म्हणाले, पुणे शहराची ओळख पुस्तकांचे शहर म्हणून होणार आहे. हा महोत्सव चिल्ड्रेन कॉर्नर, लिटरेचर फेस्टिव्हल, फूड कोर्ट आणि कल्चरल फेस्टिव्हल अशा विविध पैलूंनी नटलेला आहे. या महोत्सवाने वाचन चळवळ समृद्ध करण्यात मोठा वाटा उचलला आहेहा महोत्सव आता केवळ एका संस्थेचा नसून तो पुणेकरांचा झाला आहे. पुढील पुणे पुस्तक महोत्सव आंतरराष्ट्रीय स्तरावरील करण्याचा मानस असून, सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे शहर आगामी काळात पुस्तकांची राजधानी म्हणून ओळखली जाईल, असे पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी सांगितले.