प्रभात वृत्तसेवा पुणे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्याशी संबंधित ‘डिझाइन बॉक्स कंपनी कार्यालयाची पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने झाडाझडती घेतली. मंगळवारी (दि. १३) दुपारच्या सुमारास गुन्हे शाखेचे पथक संबंधित कार्यालयात दाखल झाले. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने कागदपत्रांची तपासणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. -ही कारवाई नेमकी कोणत्या प्रकरणात केली, याचा तपशील मिळू शकला नाही. महापालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री पवार पिंपरी चिंचवड परिसरात सभेला मार्गदर्शन करत असतानाच त्यांचे राजकीय सल्लागार असलेल्या नरेश अरोरा यांच्या पुण्यातील कंपनी कार्यालयावर गुन्हे शाखेने धाड टाकली. मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना ही कारवाई झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अरोरा हे पवारांचे राजकीय रणनीतीकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी लोकसभा व विधानसभा निवडणुकांदरम्यान पिंक कॅम्पेनसारख्या प्रभावी प्रचार मोहिमा राबवल्या.