PCMC News : शहरात पाणी साचणार नाही? महापालिका आयुक्तांचा मान्सूनपूर्व ‘मास्टर प्लॅन’ तयार
PCMC News : नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश; पूरप्रवण क्षेत्रातील नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी महापालिकेचे सूक्ष्म नियोजन सुरू.

PCMC News – येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवून आपत्तीपूर्व सूक्ष्म नियोजनावर भर द्यावा. शहरात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची ओळख करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात व नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण करावीत. तसेच पूरप्रवण भागांतील नागरिकांच्या स्थलांतराचे पूर्वनियोजन करावे आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत माजी महापौर मधुकरराव पवळे सभागृहात मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर यांच्यासह विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
शहरातील धोकादायक इमारतींची तात्काळ पाहणी करून संबंधितांना नोटीस देण्यात यावी व अशा ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याची कार्यवाही करावी. तसेच अनधिकृत व धोकादायक होर्डिंग्ज तातडीने काढून टाकावीत. होर्डिंगधारकांसमवेत नियमित बैठकांचे आयोजन करून नियमांची माहिती द्यावी व नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी.
तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तात्काळ मदत मिळावी यासाठी ‘क्विक रिस्पॉन्स टीम’ कार्यरत ठेवण्यात याव्यात. या पथकांमध्ये आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन, आरोग्य, विद्युत, स्थापत्य व उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश असावा. सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून कार्य करावे, तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रभागातील आपत्कालीन यंत्रणा सक्षम ठेवावी असे निर्देश आयुक्त सूर्यवंशी यांनी दिले.





