Fake Leopard Video: ‘एआय’च्या जंगलातील वन्यजिवांची दहशत! बनावट व्हिडिओंचा सोशल मीडियावर धुमाकूळ

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात आणि आसपासच्या समाविष्ट गावात प्रत्यक्ष बिबट्या फिरत असल्याच्या अफवांनी समाजमाध्यमे गाजत आहेत. एआयच्या आधारे तयार केलेले वन्यप्राण्यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमुळे नागरिकांमध्ये अनावश्यक भीती पसरत आहे.वनविभागाला तातडीने पथक पाठवून तासन्तास शोधमोहीम राबवावी लागत आहे. मात्र, अनेक ठिकाणी तपासानंतर हे सर्व व्हिडिओ बनावट असल्याचे स्पष्ट होत आहे.
पिंपरीतील मिलिंद वाल्मिकी आश्रम परिसरात बिबट्या आल्याचा फोटो (सीसीटीव्हीचा) समोर आला आणि काही मिनिटांतच त्या भागात भितीचे वातावरण निर्माण झाला. अशाच प्रकारचा आणखी एक फोटो खडकी बस थांबा परिसरातील सोशल मीडियावर दिसून आला. पण कोणतीही हालचाल, पावलांचे ठसे किंवा पुरावा न मिळाल्याने संशय वाढला.
तांत्रिक पडताळणीत अखेर हा व्हिडिओ कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने तयार केलेला असल्याचे उघड झाले. मात्र नागरिकांमध्ये आजही भितीचे वातावरण कायम आहे.पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर भागामध्ये मोठ्या प्रमाणात बिबटे आढळून येतात. शिरूरमध्ये तर नरभक्षक बिबटेही असून त्यांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत.
यापूर्वी पिंपरी चिंचवड परिसरातील प्राधिकरण भागात दोनवेळा बिबट्या आला होता. वनविभागाच्या पथकाने त्यावेळी बिबट्याला पकडले आहे. त्यामुळे शहरात बिबटे येतात, अशी भिती आजही नागरिकांच्या मनात कायम आहे. तसेच हिंजवडी, च-होली आणि आसपासच्या परिसरात बिबटे आल्याचे अनेक व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर आले आहेत. या सर्व व्हिडिओची हद्द तर तेव्हा झाली की बिबट्या पाइपच्या साहाययाने इमारतीवर चढत असल्याचे दाखविण्यात आले.
जुने व्हिडिओ नव्याने एडिट
शहरातील दुर्गा टेकडी, तसेच विविध उद्याने आणि शेती असलेल्या भागाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर अशाच प्रकारचे जुने व्हिडिओ नव्याने एडिट करून प्रसारित केले जातात. काही वेळा हे व्हिडिओ विदर्भ, गोवा किंवा परराज्यातील जंगलातील असतात. व्हिडिओ पाहताच लोक घाबरतात, स्थानिक पोलीस आणि वनविभागाकडे तक्रारी करू लागतात, आणि त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर अनावश्यक ताण निर्माण होतो.
सरकारी यंत्रणांचा वेळ वाया
समाजमाध्यमांवरील प्रत्येक व्हिडिओतील माहितीची खात्री न करता ती शेअर करणे चुकीचे आहे. प्रत्यक्ष हालचाल दिसल्यास सुरक्षित अंतर ठेवून त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा,” असे आवाहन पोलीस करीत आहेत. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ‘एआय’चे किमया वाढत असताना, तिचा वापर नुसत्या मजेसाठी करून अफवा पसरवणाऱ्यांची संख्या चिंताजनक आहे. अशा चुकीच्या व्हिडिओंमुळे नागरिक भयभीत होत असून सरकारी यंत्रणेचा मौल्यवान वेळ वाया जात आहे.




