Chinchwad Crime : चिंचवडमध्ये सराईत गुंडांचा धुमाकूळ! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची कारवाई
Chinchwad Crime : वाल्हेकरवाडी येथे धक्का लागल्याच्या शुल्लक कारणावरून दोघांना घरातून ओढत नेत बेदम मारहाण; ७ एप्रिलच्या घटनेनंतर आता पोलिसांची कारवाई.

Chinchwad Crime – चिंचवड मधील वाल्हेकरवाडी येथे रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या टोळक्याने राडा घातला. धक्का लागल्याच्या कारणावरून सात जणांनी मिळून दोघांना बेदम मारहाण केली. ही घटना ७ एप्रिल रोजी रात्री घडली. सुरवातीला पोलिसांनी अदखल पात्र गुन्हा दाखल केला. मात्र सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी दखल घेतली. चिंचवड पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
अनुज अशोक भोईटे (वय २३), रोशन राजेंद्र राणे (वय २५), संकेत संजय शेळके (वय २७), अक्षय शरद चौधरी (वय २६) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह कमलेश अशोक पाटील (वय २५), रोहित सयाजी जाधव (वय २५), अब्दुल्ला (वय १९, सर्व रा. चिंचवड) यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मनोज भिल्लू राठोड (वय ३४, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी गुरुवारी (दि. १६ एप्रिल) रोजी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनोज राठोड आणि त्यांचा मित्र सतीश सोपानराव भोईने या दोघांना आरोपी अनुज भोईटे याचा धक्का लागला. त्यावरून भोईटे याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून मनोज राठोड आणि त्यांचा मित्र सतीश भोईटे यांना घरात घुसून मारहाण केली. घरातून बाहेर रस्त्यावर नेऊन आरोपींनी दोघांना बेदम मारहाण केली.
अनुज भोईटे याने मनोज राठोड यांच्या डोळ्यावर हातातील कड्याने मारून त्यांना जखमी केले. मनोज राठोड यांनी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. आरोपी अनुज भोईटे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. चिंचवड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.





