ZP President Election : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीचा मुहूर्त ठरला! ‘या’ तारखेपूर्वी होणार पहिली बैठक..जाणून घ्या
ZP President Election : सुरुवातीला पंचायत समिती सभापती-उपसभापती आणि त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी होणार निवडणूक; जिल्हाधिकारी लवकरच कार्यक्रम करणार जाहीर.

ZP President Election – राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता सर्वांचे लक्ष अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती, उपसभापती यांच्या निवडीकडे लागले आहे. राज्य सरकारने या प्रक्रियेला गती दिली असून दि. २० मार्च पूर्वी जिल्हा परिषदेची पहिली बैठक घेऊन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती निवड प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
जिल्हा परिषदेचा निकाल दि. ९ फेब्रुवारी २०२६ला जाहीर करण्यात आला. निकालानंतर १५ दिवस झाले तरी अध्यक्ष, सभापती यांच्या निवडक करण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे नवनिर्वाचित सदस्यांची पहिली बैठक होऊ शकलेली नाही. अखेर, राज्याच्या ग्रामविकास विभागाने याबाबतचे आदेश बुधवारी निवडणूक झालेल्या १२ जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम, १९६१ च्या कलम ११(१) आणि ५९(१) नुसार, नवनिर्वाचित सदस्यांचा कार्यकाळ हा त्यांच्या पहिल्या बैठकीपासून सुरू होतो.
त्यामुळे ही पहिली बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. त्यानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांची पहिली बैठक २० मार्चच्या अगोदर घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी लवकरच या निवडीचा कार्यक्रम जाहीर करणार आहेत. प्राथमिक माहितीनुसार आधी तालुकास्तरीय पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती यांच्या निवडी त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
या जिल्ह्यांमध्ये निवडी..
जिल्हा परिषद निवडणूक पार पडलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशीव, लातूर , परभणी या जिल्ह्यांमध्ये सत्तास्थापनेसह अध्यक्ष, सभापतींच्या निवडी होणार आहेत.





