ZP Election : निघोजमध्ये तगडी टक्कर! राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आमनेसामने ; महिला आणि युवा मतदार निर्णायक ठरणार

प्रभात वृत्तसेवा
निघोज – पारनेर तालुक्यातील निघोज जिल्हा परिषद गटात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरराजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून सुदामती विठ्ठल कवाद, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कडून डॉ. भास्करराव शिरोळे, तर भारतीय जनता पक्षाकडून सचिन मच्छिंद्र वराळ पाटील हे तिघेही उमेदवारीसाठी सज्ज झाले आहेत.या तिघांमधील स्थानिक पातळीवरील प्रभाव आणि जनसंपर्क लक्षात घेता निवडणूक .ित्रकोणी होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
राष्ट्रवादीच्या सुदामती कवाद या महिला नेतृत्वात प्रबळ असून, गावोगावी कार्यकर्त्यांचा मजबूत पाठिंबा त्यांना लाभला आहे. अजित पवार गटाच्या प्रचारयंत्रणेतून त्यांच्यासाठी जोमाने तयारी सुरू आहे.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे डॉ. भास्करराव शिरोळे हे शिक्षण व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी विकास आणि ग्रामविकासाच्या प्रश्नांवर सतत पाठपुरावा केला आहे.
त्यांच्या सभोवती निष्ठावान शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांचा मोठा जनसमर्थनाचा उत्साह दिसतो आहे.भाजपकडून सचिन मच्छिंद्र वराळ पाटील हे तरुण, ऊर्जावान आणि लोकसंग्रह असलेले कार्यकर्ते म्हणून समोर आले आहेत. त्यांनी मागील काही वर्षांत निघोज परिसरातील पाणी, रस्ता, वीज आणि युवक रोजगाराच्या प्रश्नांवर सक्रिय भूमिका घेतली आहे. त्यामुळे युवा मतदारवर्ग भाजपकडे झुकत असल्याचे राजकीय सूत्रांचे मत आहे.
या तिन्ही उमेदवारांनी आपापल्या पातळीवर प्रचारयंत्रणा सुरू केली असून, गावोगावी बैठका, जनसंपर्क दौरे आणि मतदार संवाद कार्यक्रमांना वेग आला आहे. स्थानिक मुद्द्यांमध्ये पाणी, रस्ता, शिक्षण, आणि बेरोजगारी हे विषय केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे. निघोज जिल्हा परिषद गटात महिला व युवा मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने त्यांची भूमिका निवडणुकीत निर्णायक ठरेल, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. आगामी काही दिवसांत प्रचारात रंगत येणार असून, या गटातील स्पर्धा चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.





