ZP Election 2026: कामथडी-भोंगवली गटात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; नव्या चेहऱ्यांमुळे समीकरणं बदलणार?

प्रभात वृत्तसेवा
कापूरहोळ – भोर तालुक्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या कामथडी-भोंगवली जिल्हा परिषद गटात दिग्गज आणि नवख्या उमेदवारांमध्ये अटीतटीची निवडणूक होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आणि काँग्रेस या चार प्रमुख पक्षांमध्ये चौरंगी लढत होण्याची शक्यता असून सर्वच इच्छुक उमेदवारांनी गावोगावी भेटी देत मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
या गटात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीकडून माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे आणि जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य विक्रम खुटवड यांनी तयारी सुरू केली आहे. गटातून एक जि.प. सदस्य व भावी सभापती पदाच्या वाटाघाटींमधून तोडगा निघण्याची शक्यता असून, तो न निघाल्यास पक्षबदलाचेही संकेत आहेत.
शिवसेना (शिंदे) कडून कुलदीप कोंडे यांचे लढण्याचे संकेत नसले तरी ऐनवेळी उमेदवार दिला जाईल. भाजपकडून माजी उपसभापती रोहन बाठे, राहुल लेकावळे, महेश टापरे तसेच राजगड कारखान्याचे संचालक के. डी. सोनवणे यांचे चिरंजीव महादेव सोनवणे इच्छुक आहेत. दोन दशके पत्रकारीतेत काम करणाऱ्या वैभव धाडवे पाटील यांची उमेदवारी काँग्रेस (आय) पक्षातून निश्चित मानली जात आहे.
राष्ट्रवादी (शरद पवार) व राष्ट्रवादी (अजित पवार) एकत्रित लढण्याचे संकेत असल्याने तुतारीची स्वतंत्र दावेदारी दिसत नाही.कामथडी गणात महिला आरक्षण असल्याने भाजपकडून सरपंच निता इंगुळकर, सोनम गोळे, शशिकला गोरड, हेमलता धावले, प्राजक्ता पांगारे इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून वंदना गोरड, सारिका मालुसरे, वैशाली गाडे, शिवसेनेकडून क्रांती धुमाळ,
मनीषा पांगारकर, मोनिका जाधव इच्छुक आहेत. तसेच, भोंगवली सर्वसाधारण गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून गणेश निगडे, उदय शिंदे यांची नावे पुढे येत आहेत. भाजपचे महेश धाडवे, अनिल साळुंखे, वसंत परबळ, विनोद चौधरी, शिवसेनेकडून विकास चव्हाण, हर्षद बोबडे, किशोर बारणे, अक्षय सोनवणे हे देखील रिंगणात उतरणार असून नेमके कोणत्या पक्षातून लढणार हे स्पष्ट केले नाही.
नव्या चेहऱ्यांचे वर्चस्व निर्णायक ठरणार
भोर तालुक्यातील जि. प., पं. स.च्या राजकारणावर गेली २० ते २५ वर्षे केळवडे, केंजळ, उत्रोली, हातवे या गावांचे वर्चस्व राहीलेले आहे. निवडणुकीमध्ये राजकीय समीकरणे बदलत असून नवीन चेहरे इच्छूक आहेत. राजकीय बदल करण्यासाठी नव्या चेहऱ्यांचे वर्चस्व निर्णायक ठरणार आहे.





