Zomato Cjp Protest : आंदोलकांच्या गर्दीत अचानक पोहोचला झोमॅटो डिलिव्हरी बॉय; महाराष्ट्रातून आलेल्या एका ऑर्डरने जिंकली हजारो हृदय.! VIDEO पाहा
हे जेवण एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी नव्हतं. महाराष्ट्रातील एका व्यक्तीने दिल्लीतील आंदोलनस्थळी उपाशी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला हे जेवण देण्यासाठी ही ऑर्डर केली होती.

Zomato Cjp Protest : दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाची धग दिवसेंदिवस वाढत आहे. NEET-UG पेपरफुटी, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हजारो विद्यार्थी आणि तरुण रस्त्यावर उतरले आहेत.
20 जुलै रोजी आंदोलकांनी ‘चलो संसद’चा नारा देत संसदेकडे मोर्चा काढला. या मोर्चादरम्यान अनेक ठिकाणी पोलिस आणि आंदोलकांमध्ये तणाव निर्माण झाला. पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्यासाठी बळाचा वापर करण्यात आल्याच्या घटना घडल्या आणि या संघर्षात काही आंदोलक जखमी झाल्याचे वृत्त आहे.
दिवसभराच्या या तणावपूर्ण वातावरणानंतर, त्याच संध्याकाळी जंतर-मंतरवर घडलेल्या एका छोट्याशा प्रसंगाने मात्र आंदोलनाच्या गर्दीत माणुसकीचा मोठा संदेश दिला. पावसात एक झोमॅटो डिलिव्हरी बॉय आंदोलकांच्या गर्दीत जेवणाचं पार्सल घेऊन पोहोचला.
मात्र, हे जेवण एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी नव्हतं. महाराष्ट्रातील एका व्यक्तीने दिल्लीतील आंदोलनस्थळी उपाशी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला हे जेवण देण्यासाठी ही ऑर्डर केली होती.
जंतर मंतर पर कल बच्चे पिट रहे थे और राष्ट्रीय बाल संरक्षण आयोग छत पर खड़े–खड़े तमाशा देख रहा था !! https://t.co/DJb8g3SbKz pic.twitter.com/6rriFU9JDD
— Sachin Gupta (@Sachingupta) July 21, 2026
‘ज्याला गरज आहे, त्याला हे जेवण द्या…’ जंतर-मंतरवर पोहोचल्यानंतर डिलिव्हरी बॉयने आंदोलकांना ऑर्डरची माहिती दिली. त्याचे शब्द ऐकून उपस्थित आंदोलकही भावूक झाले.
“मुंबई, महाराष्ट्रातून अनुज रावत नावाच्या एका व्यक्तीने हे जेवण ऑर्डर केलं आहे. जंतर-मंतरवर जो कोणी भुकेला असेल, त्याला हे जेवण द्या, असं त्यांनी सांगितलं आहे. त्यांनी ऑनलाइन पेमेंट केलं आहे,” असं डिलिव्हरी बॉयने आंदोलकांना सांगितलं.
“ज्याला गरज आहे, तो हे जेवण घेऊ शकतो,” असंही त्याने स्पष्ट केलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, डिलिव्हरी बॉय आंदोलकांमध्ये जेवण घेऊन पोहोचल्याचा हा प्रसंग अनेकांनी शेअर केला आहे.
महाराष्ट्र से अनुज रावत ने जोमेटो पर खाना ऑर्डर किया और डिलीवरी बॉय से कहा कि जंतर मंतर पर जो भूखा दिखे, उसे खिला देना !! https://t.co/pd7hTm4zwo pic.twitter.com/xWEqofe9Zo
— Sachin Gupta (@Sachingupta) July 21, 2026
डिलिव्हरी बॉयला आंदोलकांकडून धन्यवाद !
डिलिव्हरी बॉयने पावसात आणि आंदोलनाच्या तणावपूर्ण वातावरणात आपली जबाबदारी पार पाडत ऑर्डर आंदोलकांपर्यंत पोहोचवली. त्याने ग्राहकाने दिलेल्या सूचनांचं पालन करत जेवण गरजू आंदोलकांना देण्याची विनंती केली.
त्याचे शब्द ऐकताच उपस्थितांनी त्याचे आभार मानले. त्यानंतर महाराष्ट्रातून आंदोलकांसाठी जेवण पाठवणाऱ्या अनुज रावत यांचेही आंदोलकांनी आभार मानले. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत या माणुसकीच्या कृतीचं कौतुक केलं.
‘याला म्हणतात खरी माणुसकी!’
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनुज रावत आणि झोमॅटो डिलिव्हरी बॉयची जोरदार चर्चा सुरू झाली. आंदोलन, राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि पोलिस कारवाईच्या बातम्यांमध्ये या छोट्याशा कृतीने मात्र माणुसकीचा वेगळाच चेहरा समोर आणला.
“स्वतःच्या आधी दुसऱ्याच्या भुकेचा विचार करणं, यालाच खरी माणुसकी म्हणतात,” अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. महाराष्ट्रातून तब्बल 1500 किलोमीटर दूर दिल्लीतील आंदोलकांसाठी एका व्यक्तीने केलेल्या या मदतीने अनेकांची मनं जिंकली आहेत.





