पुणे | शहरात झिकाचे रुग्ण वाढले

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कोथरूड येथील भुसारी काॅलनी परिसरात राहणाऱ्या १५ वर्षीय मुलाला झिकाची लागण झाली. त्याची प्रकृती स्थिर असून शहरातील झिका बाधित रूग्णांची एकूण संख्या १५ वर पोहचली आहे, त्यामध्ये ८ गर्भवती मातांचा समावेश आहे.
शहरात मागील तीन दिवसांत झिका बाधितांची संख्या दुपटीने वाढली आहे. हे सर्व रूग्ण वारजे-कर्वेनगर, कोथरूड-बावधन, हडपसर, औंध-बाणेर, सिंहगडरोड, नगररोड आणि येरवडा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या भागात सापडले आहेत.
त्यामध्ये सर्वाधिक रूग्णसंख्या वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयातील एरंडवणे परिसरात रूग्णसंख्या ५ आहे. तर औंध-बाणेर-पाषाण परिसरातील तीन रूग्णांचा समावेश आहे. मंगळवारी (दि. 9) आणखी एका मुलगा झिका तपासणी अहवाल पाॅझिटीव्ह आला असून, त्याच्या राहत्या परिसरात सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, झिका बाधित परिसरातील घरांची तपासणी करून डास उत्पत्तीची ठिकाणे शोधून ती नष्ट केली जात आहे. त्यानुसार आतापर्यंत 13 हजार 4 ठिकाणी केलेल्या सर्वेक्षणात 354 ठिकाणी डास उत्पत्तीची ठिकाणे आढळली. तर, 40 हजार 952 कंटेनरच्या सर्वेक्षणात 495 डास उत्पत्तीची ठिकाणे आढळून आली आहेत. त्यानुसार 198 जणांना नोटीस बजावून जवळपास दीड लाखांचा दंड ठोठावण्यात आला.
गर्भवती माता सर्वेक्षण पथके…
झिकाचा परिणाम गर्भवती माता आणि तिच्या गर्भ जीवनवाढीवर अधिक होऊ शकतो. त्यामुळे महापालिका आरोग्य विभागाकडून बाधित क्षेत्रातील गर्भवती मातांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यामध्ये उद्रेक झालेल्या परिसरात 267 गर्भवती माता असून, त्यातील 114 जणांचे रक्त तपासणी नमुने एनआयव्हीकडे पाठविण्यात आले आहे.




