Actress Mugdha Shah : ‘झिरो बँक बॅलन्स, पदरात दोन मुलं आणि नव्याने सुरू झालेला प्रवास’; अभिनेत्री मुग्धा शाहांचा डोळे पाणवणारा संघर्ष
Actress Mugdha Shah : त्या या मालिकेत आनंदीला सतत त्रास देणाऱ्या खाष्ट सासू दाखवण्यात आल्या असल्या तरी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात मोठ्या अडचणींचा सामना त्यांना करावा लागला आहे.

Actress Mugdha Shah : कलाकाराला संघर्ष चुकलेला नाही. मनोरंजनविश्वात स्वतः अढळ स्थान निर्माण झाल्यानंतर आणि त्याअगोदरचा प्रवास. या दोन्ही गोष्टींमध्ये खूप फरक आहे.
सध्या स्टार प्रवाह या वाहिनीवर ‘आनंदी’ नावाच्या मालिकेची चर्चा असून, या मालिकने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतून तब्बल १३ वर्षांनी अभिनेत्री मुग्धा शाहा यांनी कमबॅक केलं आहे. त्या या मालिकेत आनंदीला सतत त्रास देणाऱ्या खाष्ट सासू दाखवण्यात आल्या असल्या तरी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात मोठ्या अडचणींचा सामना त्यांना करावा लागला आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी वैयक्तिक आयुष्यातील संघर्षाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं. बालपणापासून आर्थिक अडचणींचा सामना करत आलेल्या मुग्धा यांनी लग्नानंतरही अनेक कठीण प्रसंग अनुभवले. खिशात पैसे नसताना आणि दोन लहान मुलांना सोबत घेऊन त्यांनी नवऱ्याचे घर सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला. या निर्णयामागचे कारणही त्यांनी सांगितलं.
एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुग्धा यांनी सांगितले की, पतीसोबत सतत मतभेद होत असल्याने एकत्र राहणे कठीण झाले होते. “तो वाईट माणूस नव्हता, पण आमचे विचार आणि स्वभाव जुळत नव्हते. मुलांसाठी तडजोड करून आयुष्य जगायचे का, हा मोठा प्रश्न होता. त्यावेळी मुलांनीच मला धीर दिला. ‘तू जिथे जाशील तिथे आम्ही येऊ. जेवायला मिळालं नाही तरी चालेल,’ असे त्यांनी मला सांगितले होते.”
हेही वाचा : Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना डिस्चार्ज कधी मिळणार? मोठी अपडेट समोर, डॅाक्टरांनी दिला ‘हा’ सल्ला
मुग्धा यांनी मुलांशी नेहमीच मैत्रीचे नाते जपले. घरातील परिस्थिती असो किंवा शूटिंगदरम्यान घडलेले अनुभव, त्या प्रत्येक गोष्ट मुलांसोबत शेअर करत असत. त्यामुळे घरातील वातावरण आणि आईची मानसिक अवस्था मुलांना पूर्णपणे माहीत होती.
तिथून माझ्या नव्या आयुष्याची सुरुवात
मुलगा प्रतिकची दहावीची परीक्षा पूर्ण होईपर्यंत त्यांनी घर सोडण्याचा निर्णय पुढे ढकलला. “त्याच्या शिक्षणात अडथळा यायला नको म्हणून आम्ही थांबलो. शेवटचा पेपर झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत आम्ही गोरेगावमधील भाड्याच्या घरात राहायला गेलो. त्यावेळी प्रतिक सुमारे १६ वर्षांचा होता. तिथून माझ्या नव्या आयुष्याची सुरुवात झाली,” असे त्यांनी सांगितले.
मुलांचा आधार नसता तर…
या संपूर्ण प्रवासात मुलांनीच सर्वात मोठा आधार दिल्याचे सांगताना त्या भावूक झाल्या. “संघर्ष इतका मोठा होता की भावनांना फारसा वावच नव्हता. काम करायचं, मुलांचं शिक्षण आणि घर सांभाळायचं, एवढंच आयुष्य उरलं होतं. मुलांचा आधार नसता तर कदाचित मी आज इथपर्यंत पोहोचलेच नसते,” असे त्या म्हणाल्या.
घर सोडल्यानंतरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. “मी झिरो बँक बॅलन्सवर घर बदललं होतं. हातात काहीच नव्हतं. एका जवळच्या मित्राने त्या काळात मोठी मदत केली. मात्र माझं एकच स्वप्न होतं मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचं,” असे त्यांनी सांगितले.
मुग्धा पुढे म्हणाल्या, “मुलांना जन्म देण्याचा निर्णय माझा होता, त्यामुळे त्यांची जबाबदारीही माझीच होती. समोरच्या व्यक्तीने जबाबदारी स्वीकारली नाही म्हणून मीही हात झटकू शकत नव्हते. मी घराबाहेर पडणार असेन तर मुलांना सोबत घेऊनच पडणार, हे आधीपासूनच ठरवलं होतं.”
ती आठवण सांगितली
बोलताना त्यांनी एक आठवण सांगितली त्या म्हणाल्या, “प्रतिकचं कॉलेज सुरू झाल्यावर तो बसने प्रवास करत होता. तेव्हा मी मुलीला म्हटलं, ‘आपल्याकडे पैसे नाहीत, पण सेकंड हँड गाडी घेण्याचा प्रयत्न करूया का?’ माझं संपूर्ण आयुष्य मुलांसाठीच होतं. त्यांना चांगलं आयुष्य देता यावं, एवढीच माझी धडपड होती,” असे सांगत मुग्धा शाह यांनी त्यांच्या संघर्षमय प्रवासाची कहाणी उलगडली.





