ट्रम्प यांच्या भूमिकेवर झेलेन्स्की, शुल्झ नाराज

म्युनिक : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन धोरणांबद्दल युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की आणि जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शुल्झ यांनी म्युनिक सुरक्षा परिषदेत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रशियाविरुद्धच्या युद्धात आता अमेरिकेकडून अर्थ आणि शस्त्र सहाय्य मिळणे अवघड झाल्याचे लक्षात आल्यावर आता युरोपनेच आपले सैन्य उभे करावे, अशी अपेक्षा झेलेन्स्की यांनी व्यक्त केली.परिषदेच्या दुसऱ्या दिवशी झेलेन्स्की आणि शुल्झ या दोन्ही नेत्यांनी आपली भूमिका अधिक ठामपणे मांडली आहे.
युक्रेन रशियाशी गेल्या ३ वर्षांपासून संघर्ष करत आहे. युरोपने आता स्वतःचेच सैन्य उभे करायला हवे, या भूमिकेवर काही प्रमुख नेत्यांशी खूप चर्चा झाली आहे. आता युरोपचे सैन्य असले पाहिजे. यासाठी योग्य वेळ आली आहे, असे झेलेन्स्की म्हणाले. रशियाच्या विस्तारवादाचा आणि महत्वाकांक्षेचा युरोपातील अन्य भागांना धोका आहे.
युरोपच्या सैन्याच्या निर्मितीची कल्पना युरोपातल्या किती देशांना मान्य होईल, हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र झेलेन्स्की यांनी युरोपीय संघाकडून अनेक वर्षांपासून ही मागणी केली आहे. ट्रम्प यांनी पुतीन यांच्याशी फोनवरून केलेल्या चर्चेचा उल्लेखही झेलेन्स्की यांनी केला. युक्रेनला वगळून ही शांतता चर्चा केली जाण्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र चर्चेत युक्रेनला सहभागी करून घेतले जाईल, अशी हमी ट्रम्प यांनी दिली आहे.
दुसरीकडे अमेरिकेकडून अन्य देशांमधील निवडणुकांमध्ये केल्या जात असलेल्या हस्तक्षेपाबद्दल ओलाफ शुल्झ यांनी नाराजी व्यक्त केली. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वान्स यांनी जर्मनीतल्या कट्टर उजव्या विचारांच्या नेत्यांची भेट घेतल्याच्या पार्श्वभुमीवर त्यांनी ही नाराजी व्यक्त केली.
जर्मनीत २३ फेब्रुवारीला निवडणुका होणार आहेत. वान्स यांनी कट्टर उजव्या विचारांच्या अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी पक्षाच्या नेत्यांची भेट घेतल्याचे शुल्झ यांनी निदर्शनास आणून दिले. जर्मनीत नाझीवादाचा इतिहास होता. आता पुन्हा त्या कट्टरवादाकडे जर्मनीला पुन्हा जाऊ द्यायचे नाही, ही सोशल डेमोक्रॅट पक्षाची ठाम भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.





