झेलेन्स्की सौदी अरेबियाला रवाना; सौदीच्या युवराजांशी करणार चर्चा

किव्ह : युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. रशियाबरोबर सुरू असलेले युद्ध समाप्त करण्याच्या दृष्टीने अमेरिका आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांमध्ये सौदी अरेबियातच बैठक होणार आहे. त्यापुर्वीच झेलेन्स्की सौदीला गेले असून तेथे ते सौदी अरेबियाचे युवराज मुहम्मद बिन सलमान यांची भेट घेणार आहेत. रशियाने २०२२ मध्ये युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्यापासून विविध मध्यस्थांच्या बैठका सौदी अरेबियामध्येच झाल्या आहेत. मध्यस्थांसाठी विषय निश्चित करण्यासाठीही सौदीच्या युवराजांनीच पुढाकार घेतला होता.
अमेरिकेच्या अध्यक्षपदी ट्रम्प आल्यानंतर युक्रेनबाबतच्या अमेरिकेच्या धोरणात अमूलाग्र बदल झाला आहे. युक्रेनला मदत करण्याऐवजी शांततेसाठी युक्रेनवर दबाव आणण्याचे धोरणच ट्रम्प यांनी अवलंबले आहे. यामुळे युक्रेन आणि अमेरिकेत विसंवाद निर्माण झाला. हा विसंवाद दूर करण्यासाठी देखील सौदीच्या युवराजांनी पुढाकार घेतला आहे. अमेरिका आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांमध्ये मंगळवारी सौदी अरेबियात चर्चा होणार आहे.
ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यातल्या फिसकटलेल्या चर्चेनंतर दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये ही पहिलीच भेट होते आहे. या बैठकीला स्वतः झेलेन्स्की उपस्थित राहणार नाहीत. मात्र युक्रेनचे लष्कर प्रमुख, परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांसह वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ या चर्चेमध्ये सहभागी होणार आहे. युद्ध थांबवण्यासाठी सर्व शक्यतांबाबत आपण सकारात्मक असल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले असून आता त्यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. मात्र ट्रम्प यांच्याकडून या चर्चेमध्ये कोण-कोण सहभागी होणार आणि चर्चेदरम्यान त्यांचे धोरण कसे असणार.याबाबत स्पष्टता नाही.





