NCP News : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची तारीखही ठरली होती? गोविंदबागेतील बैठकीचा युगेंद्र पवारांकडून खुलासा
NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या (NCP Merger) चर्चांनी राज्याच्या राजकारणात पुन्हा प्रचंड वादळ निर्माण केले आहे.

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत पुन्हा एकदा राजकीय चर्चांना वेग आला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांनी विलिनीकरणाबाबत महत्त्वाचा दावा केला आहे. अजित पवार यांची यासंदर्भात बैठक झाली होती. गोविंदबागेतही बैठक पार पडली होती आणि १२ फेब्रुवारी रोजी अजितदादा स्वतः विलिनीकरणाची घोषणा करणार होते, असं युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे. (NCP News)
‘विलिनीकरण होणारच होतं, दादांची ती इच्छा होती’
युगेंद्र पवार म्हणाले की, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू होती. अजित पवार यांची याबाबत बैठक झाली होती. गोविंदबागेतही बैठक झाली, त्यावेळी पत्रकारही उपस्थित होते. सर्व काही ठरलं होतं आणि साधारण १२ फेब्रुवारीला अजितदादा स्वतः विलिनीकरणाची घोषणा करणार होते, असा दावा त्यांनी केला. (NCP News)
मात्र, अजित पवार यांच्या अचानक निधनामुळे हा विषय मागे पडला. शरद पवार यांच्यासोबत पुन्हा एकत्र येण्याची अजित पवार यांची इच्छा होती, असंही युगेंद्र पवार यांनी सांगितलं. (NCP News)
अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीची मागणी
यावेळी युगेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीची मागणीही केली. आपण विमान क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा पायलट नसल्याचं स्पष्ट करत, या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. (NCP News)
अपघाताचा चौकशी अहवाल सर्वांसमोर जाहीर करण्यात यावा आणि चौकशी लवकर पूर्ण व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. रोहित पवार यांच्यासह अनेक जण या विषयावर सातत्याने आवाज उठवत असल्याचं त्यांनी नमूद केलं. (NCP News)
गोकुळच्या मुद्द्यावरूनही सरकारवर टीका
गोकुळ दूध संघाच्या कारभारावरही युगेंद्र पवार यांनी भाष्य केलं. कोल्हापुरातील जनतेने बंटी पाटील यांच्या बाजूने कौल दिला असताना शासनाकडून नवीन संचालक नियुक्त करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचं ते म्हणाले. (NCP News)
अशा प्रकारचे निर्णय लोकशाहीसाठी घातक असल्याची टीका करत, कोल्हापुरातील स्वाभिमानी जनता बंटी पाटील यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरल्याचंही त्यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची तारीख ठरल्याचा युगेंद्र पवार यांचा दावा आणि अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीची मागणी यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. (NCP News)




