यूट्यूबर ध्रुव राठीच्या अडचणीत वाढ; दिल्ली न्यायालयाने बजाविले समन्स, नेमकं प्रकरण काय..!

YouTuber Dhruv Rathee – दिल्लीतील साकेत न्यायालयाने यूट्यूबर ध्रुव राठीला समन्स बजावले आहे. मुंबईतील भाजप प्रवक्ते सुरेश नखुआ यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात ध्रुव राठीला हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे ध्रुव राठी याच्यासमोरील अडचणी वाढल्याचे दिसून येत आहे.
भाजप नेते सुरेश नखुआ यांनी आरोप केले आहेत की, ध्रुव राठीने केलेल्या एका व्हिडीओमध्ये सुरेश नखुआ यांचा उल्लेख, ‘हिंसक आणि अपमानास्पद’ ट्रोल म्हटले होते. बार आणि खंडपीठाने दिलेल्या अहवालानुसार, साकेत न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश गुंजन गुप्ता यांनी 19 जुलै रोजी ध्रुव राठीच्या नावाने समन्स जारी केले.
या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 ऑगस्ट रोजी होणार आहे. न्यायालयाने त्याला स्पीड पोस्ट, कुरिअर तसेच इलेक्ट्रॉनिक पद्धतीने समन्स पाठवण्यास सांगितले आहे. नेते सुरेश नखुआच्या वतीने वकील राघव अवस्थी आणि मुकेश शर्मा यांनी बाजू मांडली.
यावेळी ध्रुव राठीने सुरेश नखुआ यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सदर व्हिडीओमधून केल्याचा दावा केला आहे. भाजप नेते सुरेश नखुआ यांच्यावतीने न्यायालयाला सांगण्यात आले की, ध्रुव राठीने त्यांच्याबद्दल भडकाऊ व्हिडिओमध्ये बिनबुडाचे आरोप केले आहेत.
ध्रुव राठीने हिंसक आणि अपमानास्पद ट्रोलिंगमध्ये सहभागी असल्याचे आरोप केले आहेत. ध्रुव राठीच्या या आरोपांमुळे मला टीकेला सामोरे जावे लागल्याचे सुरेश नखुआ यांनी सांगितले.





