पिंपरी | मावळ तालुक्यातील पोलीस भरतीकडे तरुणाईचा कल

कान्हे (वार्ताहर) – मावळ तालुक्यात ग्रामीण भागातून युवक आणि युतींचा पोलीस भरतीकडे कल वाढत आहे. पोलीस भरती करता ग्रामीण भागातील युवक – युवती पहाटेपासूनच चिखलसे, डोंगरमाळ व लोणावळा रेल्वे ग्राउंड आदी माळरान परिसरात व्यायाम करताना दिसून येत आहेत.
तालुक्यातील तरुणाई पहाटेच्या वेळीच पोलीस भरतीमध्ये यश मिळवण्यासाठी कसून सराव करताना दिसत आहेत. त्यात प्रामुख्याने धावणे, बैठका काढणे, जोर मारणे यांसारख्या कसरती ते करत आहेत. मावळ तालुक्यात मागील काही वर्षांमध्ये सात ते आठ तरुणांना पोलीस भरतीमध्ये यश मिळाले असून ते सेवेत रुजू झाले आहेत. त्यामुळे युवकांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळत आहे. त्यासाठी ते पहाटेपासून सराव करताना दिसत आहेत.
मावळ तालुक्यातील तरुणांना शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही. त्यामुळे तरुण अडचणीत सापडल्याने अनेकांना ओढा आता पोलीस भरती कडे वळाला आहे. तसेच ते कुटुंबांना हातभार लावण्यासाठी मजुरी सुद्धा करत आहे.
मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात युवक बारावी झाले की अकॅडमीमध्ये आपले नाव पोलीस भरतीसाठी नोंदणवत आहेत. काही तरुणांना अपयश असल्याने ते पुन्हा नव्या उमेदीने सराव करताना दिसत आहेत व भरतीसाठी सज्ज होताना दिसत आहेत.





