तरूणांनी आठवड्याला ७० तास काम करावे; नारायण मूर्तींचे पुन्हा एकदा आवाहन

Narayana Murthy | भारतीय कंपनी इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी आठवड्यातून 70 तास काम करण्याच्या आपल्या जुन्या आवाहनाचा पुनरूच्चार केला आहे. त्याचे महत्त्व अधोरेखित करताना देशाच्या विकासासाठी तरुणांना कठोर परिश्रम करण्यास सांगितले आहे. देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी आठवड्यात 70 तास काम करण्याची कल्पना त्यांनी 2023 मध्ये सर्वप्रथम मांडली होती. कोलकोतामधील इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या शताब्दी समारोहात ते बोलत होते.
नारायण मूर्ती म्हणाले की, तरुण पिढीने हे लक्षात घेतले पाहिजे की त्यांना कठोर परिश्रम करावे लागतील आणि देशाला प्रथम क्रमांकाचे राष्ट्र बनवण्यासाठी काम करावे लागेल. भारतीयांनी उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
80 कोटी भारतीय गरीब
“आम्हा भारतीयांना खूप काही करायचे आहे. आम्हाला आमच्या आकांक्षा उंच ठेवाव्या लागतील कारण 80 कोटी भारतीयांना मोफत रेशन मिळते. याचा अर्थ 80 कोटी भारतीय गरिबीत आहेत. आपण कष्ट करण्याच्या स्थितीत नसलो तर कोण कष्ट करणार? मूर्ती म्हणाले की, एखादा देश गरीबीशी लढा तेंव्हाच देऊ शकतो जेंव्हा खर्च करण्याची पात्रता देणारे उत्पन्न मिळणाऱ्या नोकऱ्या निर्माण केल्या जाऊ शकतात,” असेही त्यांनी सांगितले.
“उद्योजकतेमध्ये सरकारची कोणतीही भूमिका नाही. संपत्ती आणि रोजगार निर्माण करून राष्ट्र उभारणीत उद्योजक महत्त्वाची भूमिका बजावतात. उद्योजक राष्ट्रे निर्माण करतात कारण ते रोजगार निर्माण करतात, त्यांच्या गुंतवणूकदारांसाठी संपत्ती निर्माण करतात आणि कर भरतात. त्यामुळे एखाद्या देशाने भांडवलशाही अंगीकारली तर चांगले रस्ते, रेल्वे आणि चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण होतील,” असाही सल्ला त्यांनी दिला.
यापूर्वीही नारायण मूर्ती यांनी देशातील युवकांना ७० तास काम करण्याचे सांगितले होते. यावरून काहींनी त्यांच्यावर टीकाही केली होती.





