Social Media : आभासी दुनियेचा विळखा: रील्स आणि लाईक्सच्या नादात अख्खी पिढी भरकटतेय?
मोबाईल हातात आल्याने अवघे जग एका क्लिकवर (Social Media) आले खरे, पण याच चमकदार स्क्रीनने आजच्या तरुण पिढीला एका गूढ आभासी जगात ओढून नेले आहे.

Social Media : मोबाईल हातात आल्याने अवघे जग एका क्लिकवर (Social Media) आले खरे, पण याच चमकदार स्क्रीनने आजच्या तरुण पिढीला एका गूढ आभासी जगात ओढून नेले आहे. एकेकाळी शिवारात घाम गाळणारी आणि मैदानावर कल्ला करणारी ग्रामीण भागातील तरुणाई आज घराच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात मान खाली घालून तासनतास मोबाईलमध्ये हरवलेली पाहायला मिळत आहे.
फेसबुक, इन्स्टाग्राम रील्स, शॉर्ट व्हिडिओ आणि युट्यूब लाईव्हच्या मायाजालात सकाळपासून रात्रीपर्यंत (Social Media) तरुण वर्ग तब्बल ८ ते १० तास खर्ची घालत असल्याचे विदारक वास्तव सध्या समोर येत आहे. एका रीलला मिळणारे काही ‘लाईक्स’ आणि क्षणिक प्रसिद्धीसाठी तरुण-तरुणी रात्र-रात्र जागून काढत आहेत.
अभ्यासाचे टेबल आणि नोकरीच्या संधी मागे पडल्या असून स्क्रीनचा हा प्रकाश डोळ्यांचे गंभीर आजार, निद्रानाश आणि टोकाचा चिडचिडेपणा घेऊन येत आहे. काहींना तर युट्यूब लाईव्हवरून पैसे कमवण्याच्या नादात भान उरलेले नाही, ज्यामुळे त्यांचे करिअर पुरते भरकटले आहे.
एका हताश पालकाने “मुलाला स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महागडा फोन घेऊन दिला, पण तो दिवसभर इन्स्टावर रील्स स्क्रोल करतो, सांगूनही ऐकत नाही,” अशी खंत बोलून दाखवली. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, हा निव्वळ विरंगुळा (Social Media) नसून मेंदूला विळखा घालणारे एक गंभीर मानसिक व्यसन ठरत आहे. वेळीच संवाद, मैदानी खेळांची जोड आणि वाचनाची सवय लावली नाही, तर संपूर्ण पिढीच हातातून निसटण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.






