‘… म्हणून महाराष्ट्राला राज ठाकरे हवे होते’, मराठीत बोल म्हणणाऱ्या तरूणाला मागावी लागली माफी, मनसे नेत्याने व्यक्त केला संताप

Marathi Youth Forced To Apologise: कल्याण येथे एका मराठी कुटुंबाला अमराठी व्यक्तींकडून मारहाण करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर घडली होती. आता मराठी बोलण्यास सांगितले म्हणून एका तरूणाला कान पकडून माफी मागण्यास सांगितल्याची घटना समोर आली आहे. ठाण्यातील मुंब्रा येथे प्रकार समोर आला आहे. या प्रकरणावर आता मनसे नेते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी संताप व्यक्त केला आहे.
या घटनेचा व्हीडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत ‘याच साठी महाराष्ट्राला राज साहेब हवे होते’, असे म्हणत अविनाश जाधव यांनी संताप व्यक्त केला आहे.
नक्की प्रकरण काय?
ठाण्यातील मुंब्रा येथे एका तरूणाने भाजी विक्रेत्याला मराठीमध्ये बोलण्याचा आग्रह केला. यावेळी मराठी येत नाही, मराठी बोलणार नाही, असे म्हणत भाजी विक्रेत्याने वाद घालण्यास सुरूवात केली. मराठीत बोलणार नाही तर मी मुंब्रा बंद करेन, असे वक्तव्य तरूणाने केले. दोघांमधील बाचाबाचीचे रुपांतर मोठ्या वादात झाल्याचे पाहायला मिळाले.
तरूणाने मराठीमध्ये बोलण्याचा आग्रह केल्यानंतर भाजी विक्रेत्याने त्याच्या सहकाऱ्याने बोलवले. यावेळी स्थानिकांनी मराठी-हिंदी वाद घालू नकोस, मुंब्र्यात शांतता राहू दे, असे म्हणत तरूणाला शांत बसण्यास सांगितले. तसेच, यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्यांनी मराठी बोलायला लावणाऱ्या या तरूणाला कान पकडून माफी मागण्यास देखील सांगितले. या घटनेचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
अविनाश जाधव यांनी व्यक्त केला संताप
मनसे नेते अविनाश जाधव यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी या घटनेचा व्हीडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला. सोशल मीडिया पोस्टमध्ये ते म्हणाले की, ‘मराठी बोलणं गुन्हा ठरलाय, मराठीसाठी माफी मागावी लागतीये तेही महाराष्ट्रात! हे आता मुंबई आणि महाराष्ट्रातील प्रत्येक चौकात होणार, आणि मराठी माणूस फक्त पाहत राहील. याच साठी महाराष्ट्राला राज साहेब हवे होते… आता भोगा कर्माची फळ…’, असे म्हणत त्यांनी या घटनेवर भाष्य केले आहे.





