Youth Football Tournament : युरोपमध्ये भारतीय फुटबॉलचा डंका; पंजाबच्या मिनरव्हा अकादमीची ऐतिहासिक कामगिरी
युरोपमधील आंतरराष्ट्रीय युवा फुटबॉल स्पर्धांमध्ये पंजाबच्या मिनरव्हा अकादमी क्लब संघाने अप्रतिम कामगिरी (Youth Football Tournament) करत भारतीय फुटबॉलचा सुवर्ण इतिहास रचला आहे.

Youth Football Tournament : युरोपमधील आंतरराष्ट्रीय युवा फुटबॉल स्पर्धांमध्ये पंजाबच्या मिनरव्हा अकादमी क्लब संघाने अप्रतिम कामगिरी (Youth Football Tournament) करत भारतीय फुटबॉलचा सुवर्ण इतिहास रचला आहे. स्वीडनमध्ये पार पडलेल्या अत्यंत प्रतिष्ठित अशा ‘गोथिआ कप’ फुटबॉल स्पर्धेत मिनरव्हा अकादमी संघाने घवघवीत यश मिळवत जेतेपदावर आपले नाव कोरले.
विशेष म्हणजे, अवघ्या आठवडाभरापूर्वी याच संघाने युरोपमधील ‘हेलसिंग चषक’ सुद्धा (Youth Football Tournament) पटकावला होता. लागोपाठ हेलसिंग कप आणि गोथिआ कप या दोन्ही मोठ्या स्पर्धा जिंकण्याचा अभूतपूर्व पराक्रम करत मिनरव्हा अकादमीने आंतरराष्ट्रीय स्तरावर एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे.
या संपूर्ण युरोपियन दौऱ्यामध्ये मिनरव्हा अकादमीच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्धी संघांवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. मैदानावर उतरल्यापासूनच भारतीय युवा खेळाडूंनी अत्यंत आक्रमक आणि कौशल्याने परिपूर्ण असा खेळ सादर केला.
संघाने फुटबॉलच्या जागतिक सत्ता मानल्या जाणाऱ्या देशांच्या युवा संघांना धूळ चारली. मिनरव्हा संघाने इंग्लंडचा १२-० असा धुव्वा उडवला, तर फ्रान्सच्या संघावर १७-१ असा एकतर्फी विजय मिळवत गोलचा पाऊस पाडला.
विजेतेपदाच्या अंतिम सामन्यात मिनरव्हा अकादमीचा मुकाबला फुटबॉलची पंढरी मानल्या जाणाऱ्या ब्राझीलच्या संघाशी झाला. या अत्यंत अटीतटीच्या व रोमहर्षक सामन्यात मिनरव्हा संघाने ब्राझीलवर २-१ अशी मात करत चषकावर आपले नाव कोरले.
या संपूर्ण स्पर्धेत (Youth Football Tournament) मिनरव्हा अकादमीने सलग आठ सामने जिंकण्याचा पराक्रम केला. या आठ सामन्यांच्या प्रवासात भारतीय संघाने तब्बल ८६ गोलची नोंद केली, जे संघाचे आक्रमक धोरण आणि उत्कृष्ट समन्वय स्पष्ट करते.या ऐतिहासिक यशामागे भारतातील ईशान्येकडील खेळाडूंचा मोलाचा वाटा राहिला आहे. विजेत्या मिनरव्हा अकादमीच्या संघात बहुतांश खेळाडू हे मणिपूरचे आहेत.
फुटबॉल खेळाप्रती ईशान्येकडील राज्यांमध्ये असलेला प्रचंड उत्साह, नैसर्गिक टॅलेंट आणि खेळाडूंची मेहनत या कामगिरीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.युरोपियन क्लब फुटबॉलमध्ये भारतीय युवा खेळाडूंनी मिळवलेल्या या दणदणीत विजयामुळे जगभरात भारतीय फुटबॉलची मान अभिमानाने उंचावली आहे.






