सातारा, (प्रतिनिधी) – येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात शनिवारी (दि. 30 मार्च) झालेल्या दुचाकी अपघातात सागर गंगाधर शिंदे (वय 38, रा. विठ्ठलनगर, पुणे) यांचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. आग लावल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा आग लावून छप्पर आणि धान्याचे सात हजार रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी शांताराम रघुनाथ आवळे व नकुसा शांताराम आवळे (रा. मालगाव, ता. सातारा) यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत निर्मला उत्तम कवळे (रा. मालगाव) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना दि. 30 मार्च रोजी घडली. सदरबझार येथे दीड लाखाची घरफोडी येथील सदरबझारमधील विनीत श्रीधर पाटील (वय 49) यांचे घर फोडून चोरट्यांनी घरफोडी करून, तीन तोळ्यांच्या सोन्याच्या दोन बांगड्या, मंगळसूत्र, सोन्याचा नेकलेस, मोत्याचा हार, लॅपटॉप, मनगटी घड्याळ, असा एक लाख 64 हजार 639 रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत विनीत पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 24 ते 29 मार्च दरम्यान घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विवाहितेच्या छळप्रकरणी तिघांवर गुन्हा शीतल हेमंत परब (रा. सदरबझार, सातारा, मूळ रा. डोंबिवली) या विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी हेमंत परब, सुमन परब, तन्वी पाडी यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सासरच्या मंडळींनी 2020 ते मार्च 2024 या कालावधीत छळ केल्याचे शीतल परब यांनी तक्रारीत म्हटले आहे. भोंदवडे येथील युवतीची नैराश्यातून आत्महत्या लग्न ठरत नसल्याने आलेल्या नैराश्यातून भोंदवडे, ता. सातारा येथील पौर्णिमा चंद्रकांत शिंदे (वय 28) या युवतीने शनिवारी (दि. 30 मार्च) विषप्राशन करून, आत्महत्या केली. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पौर्णिमा शिंदे हिने नैराश्यातून गवतावर फवारण्याचे औषध पिले. तिला सातारा येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. पौर्णिमाचा भाऊ रविकुमार शिंदे (वय 30) यांचा जबाब पोलिसांनी नोंदवला. लग्न ठरत नसल्याने बहिणीला नैराश्य आले होते. त्यातूनच तिने आत्महत्या केली, असे त्यांनी जबाबात म्हटले आहे.