काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडींना वेग ; शिवानी वडेट्टीवारांसह अनेकांची तडकाफडकी उचलबांगडी

Youth Congress । नागपूरमध्ये काँग्रेस पक्षात मोठ्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत. कारण संघ मुख्यालयाला घेराव घालण्यासाठीच्या आंदोलनावरून युवक काँग्रेसमध्ये जोरदार वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. युवक काँग्रेसच्या या अत्यंत महत्त्वाच्या आंदोलनामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी दांडी मारल्यामुळे तब्बल 60 पदाधिकाऱ्यांना तडकाफडकीने पदमुक्त करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवानी वडेट्टीवारांसह अनेकांना तडकाफडकी कार्यमुक्त Youth Congress ।
काँग्रेसने पदावरून दूर केलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये विजय वडेट्टीवार यांची कन्या आणि युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांचे सुपुत्र युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस केतन ठाकरे, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अनुराग भोयर, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मिथिलेश कन्हेरे यांच्यासह अनेक युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे पक्षात आता काही मोठ्या घडामोडी घडणार असल्याचे बोलले जात आहे.
पक्षाने का घेतला हा निर्णय ? Youth Congress ।
रविवारी युवक काँग्रेसने नागपुरात संघ मुख्यालयावर जाऊन संघप्रमुख मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्याचे आंदोलन अचानक पुकारले होते. मात्र या आंदोलनात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चिब, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्यासह काही कार्यकर्ते सहभागी झाले असताना अनेकांनी या आंदोलनाला दांडी मारली होती. त्यामुळे अवघ्या 50- 60 कार्यकर्त्यांसोबत युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांना काँग्रेसच्या कार्यालयावरून संघ मुख्यालयाकडे निघण्याची वेळ आली होती. मात्र या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यालयासमोरच अडवले त्यामुळेच तडकाफडकीने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस मधील साठ पदाधिकाऱ्यांना पदावरून कार्यमुक्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
सरसंघचालकांविरोधात युवक काँग्रेसचं आंदोलन
‘अयोध्येत 22 जानेवारी 2024 रोजी श्री रामाची प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हा देश खऱ्या अर्थाने मुक्त झाला’ या सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांच्या वक्तव्याविरोधात नागपुरात युवक काँग्रेसने आक्रमक पवित्र घेत आंदोलन पुकारले होते. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चीब यांच्या नेतृत्वा खाली हा मोर्चा विनापरवानगी मुख्यालयाच्या दिशेने जाणार होता. मात्र अवघ्या 50- 60 कार्यकत्यांना पोलिसांनी अडवून त्यांचे आंदोलन रोखले.





