पिंपरी | फायनान्स कंपनीच्या त्रासामुळे तरुणाची आत्महत्या

पिंपरी, (प्रतिनिधी) – दुचाकीचा 7 जुलै रोजी हप्ता भरला असतानाही 17 जुलै रोजी तीन हप्ते थकल्याचे सांगत मारहाण करीत दुचाकी जबरदस्तीने नेली. याचा मानसिक धक्का बसल्याने पतीने पत्नीला व्हिडिओ कॉल करीत गळफास घेतला. हा धक्कादायक प्रकार आळंदी जवळील चिंबळी येथे घडला.
माधव हनमंत वाघमारे (वय 32, रा. बर्गेवस्ती रोड, चिंबळी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांचा भाऊ केशव हनमंत वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, माधव यांनी एका खासगी फायनान्स कंपनीकडून 2022 मध्ये कर्ज घेतले होते.
कर्जाच्या हप्त्याची ते नियमित परतफेड करीत होते. 6 जुलै रोजी देखील माधव रांजणगाव येथे कामानिमित्त गेले असता तिथे येऊन फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधीने कर्जाचा हप्ता नेला.
मात्र 17 जुलै रोजी याच खासगी फायनान्स कंपनीचा प्रतिनिधी रांजणगाव येथे गेला. कर्जाचे तीन हप्ते थकले आहेत. आत्ताच 49 हजार रुपये भरा, असे सांगितले. तसेच माधव यांना मारहाण करून त्यांची दुचाकी जबरदस्तीने घेऊन गेला. याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल आहे.
दुचाकी नेल्याचा बसला मानसिक धक्का
दुचाकी नेल्याचा मोठा मानसिक धक्का माधव यांना बसला. याबाबत त्यांनी वेळोवेळी पत्नी आणि भावाला याबाबत सांगितले. रक्षाबंधन व इतर काही कार्यक्रमानिमित्त भाऊ, पत्नी, मुले लातूर येथील आपल्या गावी गेले होते.
त्यावेळी माधव यांनी पत्नीला व्हिडिओ कॉल करीत आपण आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. त्यांना अडविण्याचा प्रयत्न भाऊ व पत्नीने केला.
या दरम्यान भावाने पिंपरी चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क करून ही हकीगत सांगितली. नियंत्रण कक्षाने सांगितल्याप्रमाणे भावाने आळंदी पोलिसांशी संपर्क साधून मदतीची मागणी केली.
मात्र पोलीस घरी पोहचण्यापूर्वीच माधव यांनी गळफास घेत आत्महत्या केली. आपल्या भावाच्या आत्महत्येला खासगी फायनान्स कंपनीचे वसुली एजंट जबाबदार असल्याचा आरोपी मयत माधव यांचा भाऊ केशव यांनी केला आहे.
माधव वाघमारे यांच्या आत्महत्या प्रकरणी अकस्मात मयत म्हणून नोंद केली आहे. मयताच्या नातेवाइकांनी केलेल्या आरोपांच्या पाश्र्वभूमीवर तपास केला जाईल. तपासात निष्पन्न झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. भीमा नरके, वरिष्ठ निरीक्षक, आळंदी पोलीस ठाणे





