पुणे – मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी युवा सेना आग्रही असते. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी निगडित प्रश्नांसाठी युवा सेना लक्ष केंद्रित करणार आहे. त्याचाच एक भाग म्हणजे पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील 25 महाविद्यालयांत युवा सेना कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
विद्यार्थ्यांचे वसतिगृह, परीक्षा, शुल्क, विस्कळीत शैक्षणिक वर्ष अशा विविध प्रश्नांवर सरदेसाई यांनी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सरदेसाई म्हणाले की, युवासेनेच्या राज्य कार्यकारिणीकडून पुणे विद्यापीठाच्या प्रश्नांकडे थोडे दुर्लक्ष झाले. मात्र, यापुढे विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे कोणत्याही प्रकारच दुर्लक्ष होणार नाही.
विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुणे शहरातील 25 महाविद्यालयात नव्याने युनिट स्थापन करण्यात आले आहे. त्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधींची नेमणूक करण्यात आली आहे. या प्रतिनिधींमार्फत विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यात येईल. सिनेट सदस्य बाकेराव बस्तेयांच्यांकडूनही विद्यार्थ्यांसाठी विविध प्रश्न मांडण्यात येईल, असेही सरदेसाई यांनी सांगितले.