“कौतुक करून तुम्ही उपकाराची भावना दाखवताय” कोयता हल्ल्यातून विद्यार्थिनीचे प्राण वाचवणाऱ्या लेशपालची प्रतिक्रिया

पुणे – सदाशिव पेठेत मंगळवारी २७ जून रोजी एका विद्यार्थिनीवर तरुणाने कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली होती. काही दिवसांपूर्वीच एमपीएससी परिक्षेत राज्यात सहावी आलेल्या दर्शना पवारची निर्घृण हत्या झाली. ही घटना ताजी असतानाच काल घडलेल्या घटनेने पुणे हादरले. मात्र वेळीच तेथील तरुणांनी प्रसंगवधान दाखवत त्या मुलीचे प्राण वाचवले. लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील असे या दोन तरुणांचे नाव आहे. सध्या राज्यभरातून या दोघांचे कौतुक केले जात आहे.
मात्र लेशपालने फेसबुक पोस्ट लिहीत कौतुक न करण्याचे आवाहन केले आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले की, “सगळीकडून कौतुक होतंय खरं, पण हे माझं कर्तव्य होतं. उलट तुम्ही माझं कौतुक करून उपकाराची भावना दाखवताय… मी त्या ताईवर उपकार केले नाहीत. तर मी माझं कर्तव्य पार पाडलं. तरीही सर्वांचे खुप खूप आभार…”
ही घटना सकाळी दहाच्या सुमारास घडली. तेव्हा जवळील वाचनालयातून बाहेर आलेल्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना एक तरुण तरुणीच्या मागे कोयता घेऊन धावताना दिसला. एमपीएससी टॉपर दर्शना पवारचे खून प्रकरण ताजे असतानाच डोळ्यासमोर असे काही घडताना पाहून त्यांना धक्का बसला. यातील लेशपाल जवळगे याने धाडस दाखवत आरोपी शंतनू जाधवच्या मागे धाव घेतली.
आरोपी तरुणीवर कोयत्याने वार करत असतानाच लेशपालने त्याला धक्का देऊन खाली पाडले. यानंतर मागून आलेल्या हर्षद पाटील याने आरोपीच्या हातातील कोयता खेचून घेतला. त्यांच्या मदतीला सतीश नेहूल आणि इतर विद्यार्थी धावले. काही नागरिक आणि तरुणांनीही धाव घेत शंतनूला मिळेल त्या वस्तूने मारण्यास सुरुवात केली. नागरिकांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी शंतनूला घेराव घालून वाचवले. त्याला पकडून शेजारील पेरुगेट पोलीस चौकीत नेले.
जितेंद्र आव्हाड यांच्याकडून ५१ हजार रुपयांच बक्षीस जाहीर
दरम्यान, लेशपाल आणि हर्षद या दोघांनी कोयता हल्ल्यातून तरुणीला वाचवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या तरुणांना ५१ हजार रुपयांच बक्षीस जाहीर केलं आहे. “बक्षीसाने त्यांच्या धाडसाचे मूल्य करता येणार नाही. पण, त्यांच्या पुढील शिक्षणासाठी त्यांना मदत नक्कीच होईल असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. हे दोन्ही तरुण पुण्यात MPSC ची तयारी करत आहेत,” असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.





