Maratha reservation: ‘आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्यास तुमचे 288 उमेदवार पाडू’; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

Maratha reservation । Manoj Jarange – मराठा समाजाला राज्य सरकारने न्याय द्यावा, आमची खदखद तुम्हाला परवडणारी नाही. सरकारला सावध करतो की आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्यास तुमचे 288 उमेदवार पाडू, असा थेट इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा आज समारोप झाला आहे. यावेळी मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेला अल्टिमेटम देखील आज संपला आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर निशाणा साधला आहे.
मनोज जरांगे म्हणाले, सरकारला सत्तेवर मराठ्यांनीच बसवले आहे. आता विधानपरिषदेत जे निवडून आलेत त्यांना मराठ्यांच्या आमदारांनीच मतदान केले आहे.
आमच्यावर अन्याय झाला तर या आमदारांना पुन्हा लोक निवडून देणार नाहीत. मराठ्यांच्या जीवावर काल आमदार झाले. ज्यांनी या आमदारांना मतदान केले त्यांची जबाबदारी आहे आता जातीयवाद होऊ नये.
विरोधक बैठकीला आले नाहीत म्हणून चालढकल करणे योग्य नाही. तुम्ही सरकार आहात, तुम्ही आरक्षण द्यायला हवे. तुम्ही आमच्या पोरांचे बळी घेणार का? लोक रस्त्यावर उतरत आहेत, हे तुम्हाला दिसत नाही का? सगळ्या जनतेला समान न्याय द्या.
सरकारला मराठ्यांचा रोष परवडणारा नाही. आरक्षण ही आमची खदखद आहे. आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्यास 100 टक्के तुमचे 288 उमेदवार पाडू, असा इशारा देखील त्यांनी दिला.
सरकारशी आमचं काहीही बोलणे झालेला नाही. आज पूर्ण दिवस त्यांच्याकडे आहे. आजचा दिवस वाट बघू. सरकार मराठ्यांची फसवणूक करत का ते बघू. आमचे अजूनही काही टप्पे बाकी आहेत. आता पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहोत. लवकरच तो देखील जाहीर करू, असेही त्यांनी म्हटले आहे.





