Crime News : शिरुरच्या लॉजिंगमध्ये तरुणीवर अत्याचार; ७ जणांचा सहभाग, एकाला अटक
Crime News : याच लॉजवर दोन दिवसांपूर्वी एमडी ड्रग्स विकणारे पकडले गेले होते.

शिरूर : चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणीला शिरूर येथील हॉटेल मार्वल इन लॉजिंगमध्ये आणून तिच्यावर नशेची पावडर देत इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी एका आरोपीला अटक केली आहे. याच लॉजवर दोन दिवसांपूर्वी एमडी ड्रग्स विकणारे पकडले गेले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार (दि.१९) ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ ते (दि.२१) या दरम्यान लॉजिंगमधील एका खोलीत घडल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, दीपक श्रीमंदीलकर, दीपक भोसले, सागर ढवळे, अजय घेगडे यांनी चांगले पैसे मिळवून देणारे काम देण्याचे आमिष दाखवून तिला कारमधून लॉजिंगमध्ये आणले. आरोपी दीपक श्रीमंदीलकर (रा रामलिंग शिरूर), अजय घेगडे (रा. माठ, जि अहिल्यानगर), ऋषीकेश ढवळे (रा. ढवळगाव, जि. अहिल्यानगर), दीपक भोसले (रा मावळेवाडी, जि. अहिल्यानगर), सागर राधू ढवळे (रा. ढवळगाव), अनिकेत पठारे (रा. मावळेवाडी), एक अनोळखी व्यक्तीनी तिला पांढऱ्या रंगाची नशा येणारी पावडर खायला दिली.
त्यानंतर तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अनिकेत पठारे यानेही जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. गुन्ह्यातील आरोपी दीपक भोसले यास शिरूर पोलिसांनी (दि.२२) रोजी पहाटे अटक केली आहे. इतर आरोपींचा तपास सुरू आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक हणमंत नकाते करीत आहेत.
लॉजिंगमध्ये वादग्रस्त कारनामे
अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून लॉजिंगमधील सीसीटीव्ही फुटेज, संबंधित वाहन तसेच इतर पुरावे तपासले जात आहेत. दरम्यान, लॉजिंगमध्ये नोकरीचे आमिष दाखवून महिलेला आणून अत्याचार केल्याने शिरूर शहरात खळबळ उडाली आहे. याच लॉजिंगमध्ये एमडी ड्रग्स विकणारे सापडले आहेत. अनेक बेकायदा व्यवसाय या लॉजिंगमध्ये सुरू असून या लॉजिंग मालकाला अभय कोणाचे असा प्रश्न निर्माण होत आहे. अशा ठिकाणी बेकायदा प्रकारांना आळा घालण्यासाठी लॉज मालकावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.





