विरंगुळा म्हणून मासे पकडण्यासाठी जाणं जीवावर बेतलं; पाझर तलावात बुडून तरूणाचा मृत्यू

शिक्रापूर – सणसवाडी (ता. शिरूर) येथील गव्हाणे वस्ती येथे पाझर तलावामध्ये मासेमारी करण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा पाण्यात पडून मृत्यू झाला. सोनू नारायणदास बनसकर (वय 27, सध्या रा. सणसवाडी, ता. शिरूर, मूळ रा. बिहार), असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
सणसवाडी येथे राहणारा सोनू बनसकर हा युवक सुट्टी असल्याने विरंगुळा म्हणून मासेमारीसाठी गव्हाणे वस्ती पाझर तलावावर रविवार (दि.3) दुपारी गेला होता, मासेमारी करत असताना अचानक सोनू पाण्यात पडला व पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला, असा प्राथमिक अंदाज पोलीस कर्मचारी व स्थानिकांनी वर्तवला आहे.
पोलीस पाटील दत्तात्रय माने यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण वाघोली येथील अग्निशमन केंद्राला माहिती दिली. प्राधिकरणचे उपव्यस्थापक अधिकारी विजय महाजन, वाहन चालक नितीन माने, फायरमन महेश पाटील, संदीप तांबे, उमेश फालके, पोलीस नाईक प्रताप कांबळे व तळोले यांनी अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढला.





