औरंगाबादमध्ये तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, परिसरात हळहळ

औरंगाबाद – सलग दोन वर्षापासून शेतकऱ्यावर आलेल्या संकटामुळे आर्थिक स्थिती खालावल्याने तरुण शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील खामगाव गोरक्ष येथे घडली आहे.
कैलास पुंडलिक काटकर असे आत्महत्या करणाऱ्या 36 वर्षीय शेतकऱ्याचे नाव आहे. ते फुलंब्री तालुक्यातील खामगाव (गोरक्ष) येथील रहिवासी आहेत. या घटनेची माहिती मिळताच वडोद बाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
काटकर यांची खामगाव शिवारात शेती असून त्यांच्या नावावर वि.वि.का सोसायटीच्या कर्जासह, खाजगी फायनान्सचे गृहकर्ज होते. तसेच काही खाजगी सावकाराकडून देखील त्यांनी उधार पैसे घेतले होते. पण गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून डोक्यावरील कर्ज कसे फेडायचे याची चिंता त्यांना सतावत होती. त्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.




