“निकालावेळी तुम्हाला माझ्या बापाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही”; सांगलीत आर.आर. पाटलांच्या मुलाचा विरोधकांना इशारा

सांगली : सध्या राज्यात नगरपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये स्पर्धा सुरु आहे. यात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी देखील त्यांच्या प्रचार सभांचा धडाका लावला आहे. त्यातच सांगलीत झालेल्याएका प्रचार सभेत त्यांनी विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला आहे. “या निवडणुकीचा निकाल 19 तारखेला स्पष्ट होईल, त्यावेळी माझ्या बापाची आठवण तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही” असे म्हणत विरोधकांना आव्हान दिले आहे.
कवठे महांकाळमध्ये झालेल्या एका सभेमध्ये रोहित पाटील यांनी विरोधकांवर परखड शब्दांत निशाणा साधला. “आज स्वातंत्र्यानंतर ७५ वर्ष नगरपंचायतीची निवडणूक आजही आहे. रस्ते, पाणी, गटारी, घरकुल अशा सर्व कामांवर लढवतोय. दुर्दैवी गोष्ट आहे. १५ वर्ष ज्यांच्या हातात सत्ता होती, नगरपंचायत होती, आज ते लोक पुन्हा एकदा आदर्श नगरपंचायत घडवण्यासाठी आम्ही एकत्र आलोय असं सांगतायत…आदर्श घोटाळा ऐकला होता”, असा टोला त्यांनी लगावला आहे.
दरम्यान, विरोधकांकडून भ्रष्टाचार होत असल्याचा दावा करतानाच त्यांनी खोचक शब्दांत टीका देखील केली आहे. “आदर्श नगरपंचायत काय असते, हेसुद्धा तुम्हाला सांगतो. जी लोकं संडासमध्ये सुद्धा पैसे खाऊ शकतात, त्या लोकांची वृत्तीसुद्धा तिथे बसण्याचीच असू शकते असं मला वाटतं”, असे रोहित पाटील म्हणाले.
यावेळी बोलताना रोहित पाटील यांनी विरोधकांना दिवंगत आर. आर. पाटील यांची आठवण देखील करून दिली. “आज राष्ट्रवादी पक्षाला इथल्या सर्वसामान्य माणसानं खांद्यावर घेतलंय. १९ तारखेला निकाल आल्यानंतर माझ्या बापाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही”, असे ते म्हणाले. २१ तारखेला आणि पुढील महिन्यात १८ तारखेला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदान होणार असून १९ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
“विकासाच्या मुद्द्यावर ज्यांना निवडणूक लढवायचीये किंवा जे मला सल्ले देतायत त्यांनी या निवडणुकीत शहरात काय प्रलंबित विकासकामं राहिली आहेत यावर माझ्यासमोर यावं आणि सांगावं. बघुयात कोण सांगतंय किती विकास झालाय आणि किती विकास झाला पाहिजे”, असे ते म्हणाले.





