पुणे जिल्हा | सुरुवात तुम्ही केली, आता शेवट मी करणार

राजगुरुनगर, (प्रतिनिधी) – सुरुवात तुम्ही केली आता शेवट मीच करणार असा थेट इशारा खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी विरोधकांना खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्व साधारण सभेत दिला.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीची 20 वी वार्षिक सर्वसाधारण सभा समितीच्या राजे शिवछत्रपती सभागृहात सोमवारी (दि.30) झाली.
या सभेला आमदार दिलीप मोहिते पाटील, खेड बाजार समितीचे सभापती कैलास लिंभोरे, उपसभापती विठ्ठल वनघरे, संचालक जयसिंग भोगाडे, हनुमंत कड, विनोद टोपे,
कमल कड, रणजित गाडे या संचाकांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, शरद पवार गट तालुका अध्यक्ष हिरामण सातकर, बाजार समितीचे माजी सभापती शांताराम चव्हाण, विलास कातोरे, दशरथ गाडे, बाळ ठाकूर, धैर्यशील पानसरे, रवी बोराटे, सुभाष होले, यांच्यासह हमाल, अडते, व्यापारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सव्वातास सभा उशीरा का सुरू झाली, सभापतींनी प्रश्नांची उत्तरे द्यावीत, बाजार समितीच्या सभापती राजीनामा निवडणूक प्रक्रिया याबाबत या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष तथा जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष हिरामण सातकर यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला.
वस्तुस्थितीवर बोलण्याचा सभासदांचा अधिकार आहे, बाजार समितीमधील राजकारण मान्य नाही, आम्ही चुकीचे काय प्रश्न विचारले. तुम्ही चुकीची उत्तरे देऊ नका.
असे मुद्दे मांडताच आमदार दिलीप मोहिते पाटील आणि हिरामण सातकर यांच्यात शाब्दिक चकमक झाली. कडक शब्दात एकमेकांवर शाब्दिक तोफा डागल्या.
तुम्ही काय कर्तृत्व केले ते अख्या तालुक्याला माहिती आहे. आपण आपल्या हिशोबात रहा, असा खोचक सल्ला हिरामण सातकर यांना आमदार मोहिते यांनी समोरासमोर भाषणातून दिला तर वादाला सुरुवात करणार्यांचा शेवट केला जाईल, असेही आमदार मोहिते यांनी स्पष्ट केले.
बाजार समितीमध्ये काम करताना सर्व संचालक, अधिकारी कर्मचारी यांबरोबर घेऊन काम केले. त्यामुळे आर्थिक बाजार समितीला इतिहासात प्रथमच 8 कोटी 22 लाख उत्पन्न मिळाले आहे. 3 कोटी 62 लाख रुपयांचा वाढावा मिळाला. बाजार समितीमध्ये राजगुरूनगर, चाकण आणि उपबाजारात अनेक विकासकामे झाली आहेत.
त्यात आमदार दिलीप मोहिते पाटील याचा मोठा वाटा आहे. त्याच्या माध्यमातून अनेक कायद्याचा व तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत.
बाजार समितीमध्ये अनेक सुविधा उपलब्ध केल्या. बदलत्या काळानुसार बाजार समिती डिजिटल मार्केट करणार आहोत. कैलास लिंभोरे, सभापती, खेड बाजार समिती
दोषी कर्मचार्यांवर कारवाई करणार
आजपर्यंत माणुसकीच्या दृष्टीकोनातून कर्मचार्यांच्या चुकांना माफ केले आहे. यापुढे कर्मचारी आणि व्यापारी यांच्यावर कायद्याने कारवाई झालीच पाहिजे त्यांचा विषय संपवा ज्यांनी-ज्यांनी पोटभाडेकरू ठेवले त्यांना आता हुसकावून लावा.
गाळा घेतला एकाने पाणी भाडेकरू तीनतीन ठेवता हे काय चालले आहे यात चुकीचे काम करणार्या कर्मचार्यांवर कडक कारवाई करा. यापुढे वशिला चालणार नाही. चुकीचे काम करणार्याला थारा देऊ नका. सभापतीचे तोंड भाजले आहे.
आता सावध व्हा, बाजार समितीत चुकीचे काम होत असताना सभापती झोपले होते का? बेकायदेशीर कृत्य बंद करा. कायद्याने आज पासून काम सुरू करा, असा सल्ला आमदार मोहिते यांनी दिला.





