Almonds Side Effects: बदाम खाण्याचे फायदे माहिती आहेत, पण अतिसेवनाचे धोके माहिती आहेत का?
Almonds Side Effects बदामामध्ये ऑक्सलेट नावाचे नैसर्गिक घटक आढळतात. शरीरात हे ऑक्सलेट कॅल्शियमसोबत एकत्र आल्यास कॅल्शियम ऑक्सलेटचे स्फटिक तयार होऊ शकतात. हे स्फटिक किडनी स्टोन तयार होण्यास कारणीभूत ठरू शकतात.

Almonds Side Effects: शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. त्यामुळेच आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञांकडून दिला जातो. सुकामेवा हा आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. त्यातही बदाम खाण्याचे अनेक फायदे आहेत. बदामामध्ये प्रथिने, फायबर, हेल्दी फॅट्स, जीवनसत्त्वे आणि अनेक आवश्यक खनिजे असतात. त्यामुळे अनेकजण रोजच्या आहारात बदामाचा समावेश करतात. काही जण सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम खातात, तर काही जण दुधासोबत त्याचे सेवन करतात.
मात्र, एखादा पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर आहे म्हणून तो कितीही प्रमाणात खावा, असे नाही. बदामाचे अतिप्रमाणात सेवन केल्यास आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. विशेषतः किडनी स्टोनचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी बदाम खाताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. जाणून घेऊया, जास्त बदाम खाल्ल्याने कोणत्या समस्या उद्भवू शकतात.
१. किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो
बदामामध्ये ऑक्सलेट नावाचे नैसर्गिक घटक आढळतात. शरीरात हे ऑक्सलेट कॅल्शियमसोबत एकत्र आल्यास कॅल्शियम ऑक्सलेटचे स्फटिक तयार होऊ शकतात. हे स्फटिक किडनी स्टोन तयार होण्यास कारणीभूत ठरू शकतात.
विशेषतः ज्या व्यक्तींना यापूर्वी किडनी स्टोनचा त्रास झाला आहे किंवा वारंवार मुतखडा होतो, त्यांनी बदामाचे अतिसेवन टाळावे. १०० ग्रॅम बदामामध्ये साधारण ४६९ मिलीग्रॅम ऑक्सलेट असू शकते. त्यामुळे अशा व्यक्तींनी आपल्या आहारात बदामाचा समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
२. वजन वाढण्याची शक्यता
बदामामध्ये हेल्दी फॅट्स असतात. त्यामुळे ते शरीरासाठी फायदेशीर ठरतात. मात्र, त्यामध्ये कॅलरीजचे प्रमाणही जास्त असते. साधारण २३ बदामांमधून सुमारे १६४ कॅलरीज मिळतात. जर तुम्ही रोजच्या आहाराव्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात बदाम खात असाल, तर शरीरात कॅलरीजचे प्रमाण वाढू शकते. दीर्घकाळ गरजेपेक्षा जास्त कॅलरीज घेतल्यास वजन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे बदाम खाताना प्रमाणाकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
:max_bytes(150000):strip_icc()/almonds-GettyImages-683814187-2000-44a06e730fac4c60a10cbb5f9642b589.jpg)
Almonds Side Effects
३. पचनाच्या समस्या उद्भवू शकतात
बदामामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. फायबरमुळे पचनसंस्था निरोगी राहण्यास आणि आतड्यांचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते. मात्र, एकाच वेळी किंवा अचानक मोठ्या प्रमाणात बदाम खाल्ल्यास पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. यामुळे काही व्यक्तींना गॅस, पोट फुगणे आणि बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे बदामाचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे योग्य ठरते.
४. शरीरातील पोषक घटकांच्या शोषणावर परिणाम
बदामामध्ये फायटेट नावाचे एक संयुग असते. तसेच त्यामध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते. अतिप्रमाणात सेवन केल्यास काही परिस्थितींमध्ये शरीराला लोह, जस्त, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारखी खनिजे शोषून घेण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे केवळ बदामावर अवलंबून न राहता आहारात वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे.
रोज किती बदाम खाणे योग्य?
आरोग्यतज्ज्ञांच्या माहितीनुसार, निरोगी प्रौढ व्यक्ती दिवसातून साधारण १५ ते २० बदाम खाऊ शकते. मात्र, ही मात्रा प्रत्येकासाठी सारखी असेलच असे नाही. व्यक्तीचे वय, आहार, शारीरिक हालचाल आणि शरीराची कॅलरीजची गरज यानुसार योग्य प्रमाण बदलू शकते. ज्या व्यक्तींना किडनी स्टोनचा त्रास आहे किंवा वारंवार मुतखडा होतो, त्यांनी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानेच बदामाचे सेवन करावे.
लक्षात ठेवा! बदाम हा पौष्टिक पदार्थ असला तरी त्याचे फायदे मिळवण्यासाठी योग्य प्रमाणात सेवन करणे महत्त्वाचे आहे. कोणताही पदार्थ आरोग्यदायी आहे म्हणून त्याचे अतिसेवन करू नका. संतुलित आहार आणि योग्य जीवनशैली हाच निरोगी आरोग्याचा पाया आहे.





