‘कोणावर काय वेळ येईल सांगता येत नाही’ वायकरांनी संजय राऊतांना खोचक लगावला ‘टोला’

Ravindra Waikar । शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांना मुंबईतील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट देण्यात आली. गैरसमजातून मुंबई महानगरपालिकेने गुन्हा दाखल केल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
आता फक्त दाऊद इब्राहिमलाच क्लीनचीट द्यायचे बाकी आहे. हे सरकार ओवाळून टाकलेले सर्व भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेत आहेत आणि आमची ताकद किती वाढली हे दाखवत आहेत. सगळ्या लोकांवरती कारवाई केली. ईडी, सीबीआयचे खटले दाखल केले. त्यात वायकरांचाही समावेश आहे. वायकर ईडी, सीबीआयला घाबरून पळून गेले. आता त्यांना क्लीनचीट देण्यात आली. मोदी आणि महाराष्ट्रातील फडणवीसांच्या सरकारमध्ये दुसरे काय होऊ शकते? अशी सडकून टीका राऊत यांनी केली.
हे काय कायद्याचे राज्य आहे का? तुमची आमच्या लोकांवर खोटे खटले दाखल केले. त्यांना भीती दाखवून तुमच्या पक्षात घेतल्याचे आता मान्य करा. मात्र आमच्यासारखे काही लोकं दबावाला बळी पडले नाहीत. अजित पवार पळून गेले, मुख्यमंत्री पळून गेले, त्यांना कारवाईची भीती होती. भाजपने आता मान्य करावे की, आम्ही यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते. वायकरांवरील गुन्हे आता का मागे घेतले? आमच्यावरील पण गुन्हे मागे घ्या, असेही राऊत म्हणाले.
दरम्यान, रविंद्र वायकरांनी संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे. संजय राऊतांना जे बोलायचं ते बोलू शकतात. त्यांना जे बोलायचं त्यांनी ते बोलावं. मी त्यांना काय सांगू. वेळ कशी असते आणि कोणावर कशी येते हे सांगू शकत नाही, असे वायकर माध्यमांशी बोलतांना म्हणाले आहे.





