संजय कडू पुणे – पोलिसांत मागील पाच महिन्यांत एकूण २१ डिजिटल अटक प्रकरणांच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे. या प्रकरणांमध्ये पीडितांना एकूण ९ कोटी २१ लाखाचा आर्थिक गंडा घालण्यात आला आहे. केंद्र सरकार व दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) यांनी जानेवारी २०२५ मध्ये एक रिंगटोन सुरू केली आहे. ज्यामार्फत नागरिकांना डिजिटल अटक प्रकारातील फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच, सायबर पोलिसांनी जनजागृती केली असतानाही, डिजिटल अटक प्रकरणांचे प्रमाण कायमच आहे. दोन वर्षातील आनलाइन खेळ पुणे शहर पोलिसांत मागील वर्षी अशी ८१ प्रकरणे दाखल झाली होती. ज्यामध्ये ४९ कोटी ७६ लाख रुपयांची फसवणूक झाली. या २१ प्रकरणांपैकी १६ प्रकरणे स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये, तर ५ प्रकरणे सायबर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली. २०२३ मध्ये पोलिसांकडे एकही तक्रार दाखल झालेली नव्हती. मागील वर्षी दाखल गुन्ह्यात सर्वात मोठा आर्थिक गंडा ६ कोटी ३० लाख रुपयांचा घालण्यात आला, त्यानंतर ३० लाख ते ६० लाखांपर्यंतच्या फसवणुकीच्या तक्रारी आल्या. बहुतांश प्रकरणांमध्ये डेक्कन, बंडगार्डन , विमाननगर, सहानगर या भागातील ज्येष्ठ व्यक्तींची फसवणूक झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे ( सायबर पोलीस ठाणे) यांनी दिली. तपासात तांत्रिक अडथळे… सायबर भामटे व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क्स (VPNs) चा वापर करीत असल्यामुळे या प्रकरणांचा तपास करणे अधिक कठीण होत आहे. तसेच, अनेक बँकखाती भाड्याने वापरायला घेतली जात आहेत. अशी बँक खाती कमिशनवर वापरायला देणाऱ्यांना अटक झाली तर सायबर गुन्ह्यांचे प्रमाण नक्कीच कमी होईल. हे सायबर भामटे दुबई किंवा कंबोडिया सारख्या देशांतून हे प्रकार चालवत आहेत. मात्र, नुकतेच एका गुन्ह्यात सायबर पाेलिसांनी रोहा (जि. रायगड) येथील रहिवाशी तुषार हरिश्चंद्र वाजंत्री (वय २८) याला अटक केली. त्याला डिजिटल अटक प्रकरणात तब्बल पाच राज्याचे पोलीस शोधत होते. तो एका राजकीय पक्षाशी संबंधीत असल्याने खळबळ उडाली आहे. भामट्यांकडून चतुश्रृत्रीचा वापर… सायबर गुन्हे अन्वेषक आणि सायबर फॉरेन्सिक तज्ज्ञ संदीप गाडिया यांनी सांगितले की, फसवणूक करणारे चार गोष्टींचा वापर करीत आहेत. यामध्ये भीती, लोभ, अज्ञान आणि बेजबाबदारी यांचा समावेश आहे ह्याच गोष्टी सायबर गुन्ह्यांना बळी पडण्यास कारणीभूत ठरत आहेत. सायबर भामटे पीडित व्यक्तीला डिजिटल अटक व कारावासाची भीती दाखवतात. ते ईडी, सीबीआय, क्राईम ब्रँच यांच्या नावाचा वापर करतात. त्याप्रमाणे सेटअप आणि गेटअप करुन व्हिडिओ कॉलिंगद्वारे संवाद साधत पैसे उकळतात . “डिजिटल अरेस्टचा कोणालाही कॉल आल्यास घाबरून न जाता सत्यता शोधावी. समोरच्या व्यक्तीस मी स्थानिक पोलीस ठाण्यात जातो, तेथील पोलिसांशी बोला असे सांगावे. तसेच, तातडीने नॅशनल सायबर पोर्टल १९३० किंवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. फसवणूक झालीच असेल तर तातडीने सायबर पोर्टलवर संपर्क साधावा जेणेकरुन समोरील व्यक्तीचे खाते फ्रीज होईल आणि आपली रक्कम सुरक्षीत राहील.” – ॲड. गौरव जाचक, सायबर कायदे तज्ञ.