Rajendra Pawar : “तू नाहीस, पण ‘काय बंधू’ म्हणणारी तुझी हाक आजही ऐकू येते”; बालपणापासूनच्या आठवणींना उजाळा देत राजेंद्र पवारांनी शेअर केले दुर्मिळ फोटो
Rajendra Pawar : त्याचप्रमाणे अजित पवार यांचे बंधू राजेंद्र पवार यांनीही हृदयस्पर्शी पोस्ट लिहित भावाला अभिवादन केले.

Rajendra Pawar : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आज त्यांची पहिली जयंती साजरी होत आहे. या निमित्ताने बारामतीतील त्यांच्या स्मृतीस्थळी कुटुंबीयांनी जाऊन अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, जय पवार तसेच पवार कुटुंबातील अन्य सदस्य उपस्थित होते. अजितदादांच्या आठवणींनी स्मृतीस्थळावर भावुक वातावरण निर्माण झाले होते.
अजितदादांच्या पहिल्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्याचप्रमाणे अजित पवार यांचे बंधू राजेंद्र पवार यांनीही हृदयस्पर्शी पोस्ट लिहित भावाला अभिवादन केले.
राजेंद्र पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये दोघांनी एकत्र घालवलेले बालपण, सुट्ट्यांतील आठवणी, आयुष्यातील प्रवास, लाल दिव्याच्या गाडीपर्यंतचा टप्पा तसेच रोहित पवार यांना राजकारणात अजितदादांनी दिलेली शिकवण आणि साथ यांचा उल्लेख केला आहे. या पोस्टसोबत त्यांनी लहानपणापासूनचे अनेक दुर्मिळ फोटोही शेअर केले असून, त्यातून दोघांमधील जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित झाले आहे.
Sharad Pawar Meet PM: शरद पवार-सुप्रिया सुळे यांनी घेतली PM मोदींची भेट; काय झालं नेमकं भेटीत ? वाचा
अजितदादांच्या पहिल्या जयंतीनिमित्त कुटुंबीयांसह कार्यकर्ते आणि समर्थकही भावुक झाल्याचे चित्र पाहायला मिळत असून, सोशल मीडियावरही त्यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर केल्या जात आहेत.
राजेंद्र पवारांची पोस्ट
२२ जुलै, आज तू ६७ वर्षे पूर्ण, म्हणजे माझ्यापेक्षा एक वर्षाने लहान. डोळ्यापुढून सारा काळ सरकतो.आपण ४-५ वर्षाचे असताना तू रात्री बारामतीत कंदील घेऊन पळून जाऊन अंधाराची भीती दाखवे,उन्हाळ्यात फाट्यात पोहून फुफाट्यात आपण रस्त्यावर लोळलो. त्यावेळी पाटकऱ्याला आपण घाबरलो पण मोठेपणी त्याच खात्याचा तू मंत्री झालास. शाळेचे सर्टिफिकेट आणताना घाबरून घरी न जाता मुंबईला शाळा उघडेपर्यंत चौपटीवरच बसलो. जाणाऱ्या लाल दिव्याच्या गाड्या पाहून आपण असे कधी होणार म्हणता-म्हणता तू मंत्री झालास. आपण दोघांनीच तात्यासाहेबांचे पंचगंगेच्या घाटावर केलेले अस्थीविसर्जनही आठवते. बेंगलोरवरून ट्रकने गाई आणल्या,प्रवासात तू मी एकत्र होतो. पंचमीला काच लावून मांजा केला पण पतंग व काटाकाटी तूच करायचा, लहानपण भराभर सरले.
तू मोठा झाला, मंत्री झाला पण मनात प्रेमाचा हळवा कोपरा कायम जपलास. रोहीत दोन महिन्याचा होता, आपण एवढा लहान घेऊन तुझ्या हनिमूनला पूर्ण गाडी चालवत उटीला गेलेलो.त्याच रोहितला पहिल्या इलेक्शनला तू सांभाळलेस. जरी पक्ष म्हणून आपण वेगळे झालो तरी शेवट-शेवट त्याच्याशीच एकत्र येण्याविषयी, एकत्र काम करण्याबद्दल जवळकीने बोललास. कृषिकच्या उद्घाटनाला येऊन आठवणीने तुझ्या वहिनीच्या हातची आवडती भाजी व कवठ खाऊन नेहमीप्रमाणे मनापासून जेवणाला दाद देऊन गेलास, आवडले ते मनापासून बोलणारा तू. तू आज नाहीस, १९६४ च्या दरम्यान आपले चुलते वसंतदादांच्या अपघाती निधनाने पवार घराणे स्तब्ध झाले होते, तसेच आज तुझ्या जाण्याने झालेय.तुझ्या असण्याचा व नसण्याचा फरक सर्वांनाच प्रकर्षाने जाणवतोय. तू नाहीस हे जरी सत्य असले तरी तू येशील हा भास मात्र होत राहतो. मनापासून तुझी आठवण येतेय. तुझे अस्तित्व जाणवत राहते, “काय बंधू” म्हणून तुझ्या हाकेच्या सादेची मन कायम वाट पाहते. अशी आठवणी राजेंद्र पवार यांनी शेअर केली आहे.





