Baramati: ‘तू काळी आहेस, मला आवडत नाही’ पतीकडून पोलीस पत्नीचा छळ; महिलेने उचललं टोकाचे पाऊल
Baramati : पतीला अटक

बारामती : तालुक्यातील करंजे येथील आणि पोलीस दलात कार्यरत असलेल्या ३१ वर्षीय महिलेच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. पतीकडून सतत मानसिक व शारीरिक छळ होत असल्याच्या आरोपांनंतर या महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
मृत महिलेचे माहेर बारामती तालुक्यातील करंजे येथे असून विवाहानंतर ती पतीसोबत डोंबिवली पश्चिम परिसरात राहत होती. तक्रारीनुसार, तिच्या वर्णावरून पतीकडून अपमानास्पद वक्तव्ये केली जात होती. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार वाद आणि मारहाण केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
घरातील खर्च आणि वस्तूंच्या खरेदीवरूनही दोघांमध्ये वारंवार वाद होत असे. सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
या घटनेप्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून पतीला अटक केली आहे. तसेच नातेवाईकांनी सासरच्या इतर सदस्यांवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे.





