Pankaja Munde – स्वतःच्या जीवाला धक्का तोच लावेल ज्याला माझ्यावर प्रेम किंवा श्रद्धा नाही. मी लढत आहे, संयम ठेवत आहे, तुम्हीही सकारात्मकता दाखवा आणि संयमाने रहा. पराभव मी स्वीकारला आणि पचवला आहे, पराभव तुम्हीही पचवा!!, असे आवाहन पंकजा यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. लोकसभा निवडणूक निकालात अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या लढतीत अखेर बजरंग सोनवणेंच्या गळ्यात खासदारकीची माळ पडली. महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा 6 हजार मतांनी पराभव झाला. या घटनेनंतर बीड जिल्ह्यातील वातावरण तणावपूर्ण बनले असून बीड जिल्ह्यातील काही तालुक्यात बंदची हाक देण्यात आली होती. बीडमध्ये पंकजा मुंडे समर्थक व बजरंग सोनवणे समर्थकांमध्ये सोशल वॉर रंगल्याचे दिसून आले. त्यावरुन, दोन्ही गटातील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. दोन दिवसांपू्र्वी पाथर्डी बंदची हाक दिल्यानंतर शिरुरही बंद ठेवण्यात आले होते. बीडमधील या वातावरणावर पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. दरम्यान, पोलिसांचाही सोशल मीडियावर वॉच असून आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत आहेत. चूलबंद आंदोलन, ग्रामस्थांचा ठराव पंकजा मुंडेंचा पराभव बीड जिल्ह्यातील अनेक जणांना जिव्हारी लागला, त्यामुळे केवळ सोशल मीडियावरच नाही तर प्रत्यक्ष बोलताना सुद्धा अनेक लोकांना हा पराभव पचनी पडताना पाहायला मिळत नाही. पंकजा मुंडे यांच्या या पराभवामुळे त्यांचे राजकीय करियर संपुष्टात आल्याचेही काहींना वाटत आहे. म्हणूनच बीड जिल्ह्यातील पांडुळ गव्हाण येथे गावातील सगळ्या नागरिकांनी एकत्रित येत मंदिरात बैठक बोलावली. पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घेऊन त्यांचे पुनर्वसन करावे, असा ठरावच ग्रामस्थांनी एकमुखाने मांडला.