Yograj Singh : ‘ते अजून खेळू शकले असते, पण…’, रोहित-विराटच्या निवृत्तीवर योगराज सिंग यांच मोठं वक्तव्य

Yograj Singh on Rohit-Virat Test Retirement : इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांनी चाहत्यांना निराश केले आहे. अनेक दिग्गज खेळाडूंचा असा विश्वास आहे की हे दोन्ही खेळाडूं अजूनही बरेच दिवस क्रिकेट खेळू शकले असते. ज्यावर आता माजी क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आहे.
रोहित-विराटबद्दल काय म्हणाले योगराज सिंग?
रोहित आणि विराटच्या निवृत्तीबद्दल एएनआयशी बोलताना योगराज सिंग म्हणाले, “विराट हा एक मोठा खेळाडू आहे, त्यामुळे त्याच्या निवृत्तीमुळे निश्चितच तोटा होईल. २०११ मध्ये जेव्हा अनेक खेळाडूंना वगळण्यात आले, निवृत्ती घेण्यात आली किंवा निवृत्त होण्यास भाग पाडण्यात आले, तेव्हा संघाची घडी विस्कटली आणि अद्याप पुन्हा ती व्यवस्थित होऊ शकलेली नाही. पण प्रत्येकाची वेळ येते. मला वाटते की विराट आणि रोहितमध्ये अजूनही बरेच क्रिकेट शिल्लक आहे.”
#WATCH | Chandigarh | On Indian Cricketers Virat Kohli and Rohit Sharma retiring from Test Cricket, former Indian cricketer Yograj Singh says, “Virat is a big player, so it will obviously be a loss. When many players were either removed, retired, or coerced into retirement in… pic.twitter.com/FKzd9aUOX5
— ANI (@ANI) May 14, 2025
संपूर्ण तरुण खेळाडूंनी भरलेला संघ नेहमीच अस्थिर –
योगराज सिंग पुढे म्हणाले की, निवृत्तीपूर्वी त्यांनी त्यांचा मुलगा युवराज सिंगलाही हाच सल्ला दिला होता. ते म्हणाले, “जेव्हा तुम्ही चालू शकत नाही, तेव्हाच मैदान सोडावे. कारण जर संघ पूर्णपणे तरुण खेळाडूंनी भरलेला असेल तर तो नेहमीच अस्थिर राहतो. कदाचित विराटला असे वाटत असेल की त्याने सर्वकाही मिळवलं असेल, म्हणून आता निवृत्तीची वेळ आली आहे.”
हेही वाचा – IPL 2025 Schedule : आयपीएलचे सुधारित वेळापत्रक जाहीर! ‘या’ तारखेला होणारा पहिला सामना
योगराज सिंग यांचे मत आहे की रोहित शर्मा आणि वीरेंद्र सेहवाग यांनी अकाली क्रिकेट सोडले. ते म्हणाले, “मला वाटतं रोहितला अशा एखाद्या व्यक्तीची गरज होती, जो त्याला दररोज प्रेरणा देईल, जसे की सकाळी ५ वाजता उठून त्याला धावण्यास सांगेल. रोहित आणि सेहवाग हे असे खेळाडू होते जे जास्त काळ खेळू शकले असते. महान खेळाडूंनी ५० वर्षांपर्यंत खेळत राहिले पाहिजे. त्यांच्या जाण्याने, तरुणांना प्रेरणा देणारे कोणतेही आदर्श शिल्लक राहिले नाहीत आणि ही दुःखद गोष्ट आहे.”





