Yogi Adityanath : उत्तरप्रदेशला गरिबीमुक्त राज्य बनवणार; योगी आदित्यनाथ यांनी केला निर्धार

लखनौ : उत्तरप्रदेशला गरिबीमुक्त राज्य बनवण्याच्या निर्धाराचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी पुनरूच्चार केला. तसेच, पुढील 4 वर्षांत उत्तरप्रदेश १ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वासही व्यक्त केला. उत्तरप्रदेश दिनानिमित्त आयोजित तीन दिवसीय विशेष समारंभाचे उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते झाले. त्यावेळी योगी बोलत होते.
आज उत्तरप्रदेश राज्य अमर्यादित सामर्थ्याचे प्रतीक बनले आहे. उत्तरप्रदेश २०१६-१७ या आर्थिक वर्षी १२ लाख कोटी रूपयांची अर्थव्यवस्था होता. सध्या राज्याच्या अर्थव्यवस्थेचे आकारमान २७ लाख कोटी रूपये इतके आहे. पुढील ४ वर्षांत १ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट राज्य गाठेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनला अनुसरून ते घडेल.
गरिबीमुक्त राज्य बनण्याच्या दिशेनेही उत्तरप्रदेशची वाटचाल सुरू आहे. पुढील वर्षीच्या उत्तरप्रदेश दिनापर्यंत गाठावयाची उद्दिष्टे आम्ही निश्चित केली आहेत. प्रत्येक गरिबाच्या डोक्यावर छत, जमिनीचे हक्क, आयुष्मान कार्ड, पेन्शन आदींचा त्यामध्ये समावेश आहे.
उत्तरप्रदेशला आध्यात्मिक वारसा लाभला आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था स्थिती सुधारली आहे. द्रुतगती मार्ग, विमानतळं आणि मेट्रोचे जाळे विस्तारत आहे. त्यातून उत्तरप्रदेश आघाडीचे पर्यटन केंद्र बनले आहे, असे भाष्य योगींनी केले.





