Yogi Adityanath : कृष्ण जन्मभूमीच्या ‘मुक्ती’साठी उघड पाठिंबा द्या; योगी आदित्यनाथ यांचे अखिलेश यांना आवाहन
अयोध्येबाबत केलेल्या विधानांवरून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी त्यांना एक मोठे आव्हान दिले आहे.

Yogi Adityanath : अयोध्येबाबत केलेल्या विधानांवरून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी त्यांना एक मोठे आव्हान दिले आहे. राम जन्मभूमी मोहिमेच्या धर्तीवर अखिलेश यांनी मथुरा येथील कृष्ण जन्मभूमीच्या ‘मुक्ती’साठीच्या चळवळीला उघडपणे पाठिंबा द्यावा, असे आवाहन आदित्यनाथ यांनी रविवारी केले.
अयोध्येतील राम मंदिराच्या देणग्यांमध्ये कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केला होता. तसेच, आपले सरकार सत्तेवर आल्यास अयोध्येचा एक अद्वितीय पवित्र शहर म्हणून विकास करू, असेही ते (Yogi Adityanath) म्हणाले होते.
या पार्श्वभूमीवर हाथरस येथील एका जाहीर सभेला संबोधित करताना आदित्यनाथ म्हणाले, अखिलेशजी, प्रभू रामाच्या भक्तांनी अयोध्येचा कायापालट आधीच केला आहे, त्याची काळजी तुम्ही करू नका. त्यापेक्षा पश्चात्ताप करून एकदा रामलल्लाचे दर्शन घ्या, जेणेकरून तुम्हाला सुबुद्धी मिळेल. आता अशी तयारी करा की आपण प्रभू श्रीकृष्णासाठीही काहीतरी करू शकू, असे योगी म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी पुढे विचारले, जर तुम्ही खरोखरच स्वतःला धार्मिकता दाखवू इच्छिता, तर मथुरा, वृंदावन आणि कृष्ण जन्मभूमीबद्दल उघडपणे का बोलत नाही? प्रभू श्रीकृष्णाच्या जन्मस्थानालाही सन्मान मिळायला हवा, परंतु या मुद्द्यावर बोलण्याचे धाडस विरोधकांमध्ये नाही, असा आरोप त्यांनी केला. सपाच्या भूतकाळातील कारभाराचा उल्लेख करत, तुमच्याच पक्षाच्या सरकारने राम भक्तांवर गोळीबार केला होता, अशी टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, अयोध्येतील राम जन्मभूमी ट्रस्टने देणग्यांच्या अपहाराचे आरोप फेटाळले असून, राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाच्या अहवालानंतर या प्रकरणी एफआयआर दाखल करून काही जणांना अटक करण्यात (Yogi Adityanath) आली आहे.






