Yogesh Kadam On Bhaskar Jadhav : ठाकरेंचा बालेकिल्ला हादरणार? भास्कर जाधवांना रोखण्यासाठी शिंदेंचा शिलेदार मैदानात

Yogesh Kadam On Bhaskar Jadhav : राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू असून, गुहागर मतदारसंघात मोठी राजकीय हलचल पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी थेट शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांना टक्कर देण्याची रणनीती आखली आहे.
गुहागरमधील उबाठा गटाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे गटात दाखल झाले, त्यानंतर योगेश कदम यांनी ठाम भूमिका घेत, “गुहागरमधील प्रत्येक वाडी-वस्तीकडे बारकाईने लक्ष देणार आहे,” अशी भूमिका घेतली. त्यांनी असंही सांगितलं की, “दापोलीप्रमाणेच गुहागरमध्येही विकासाची गती राहील.”
याआधी २००९ मध्ये याच मतदारसंघातून रामदास कदम यांचा पराभव झाला होता. आता त्यांचे पुत्र योगेश कदमच या भागात सक्रिय झाल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे की ठाकरेंचा बालेकिल्ला हादरणार का?
रामदास कदम आणि योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली खेड परिसरात काँग्रेस व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश घडवून आणण्यात आला. यामुळे शिंदे गटाची संघटना अधिक बळकट झाली आहे.
दरम्यान, आमदार निलेश राणे यांनी देखील पक्ष संघटन विस्तारासाठी सज्ज असल्याचे सांगितले. “शिवसेनेची जुनी कार्यकारणी रद्द करून नवीन कार्यकारणी स्थापन करण्यात आली असून, आगामी निवडणुकांसाठी आपली तयारी ठोस आहे,” असं ते म्हणाले. “महायुतीने जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य असेल, पण स्थानिक निवडणुकांमध्ये आम्ही ताकदीनं उतरू,” असा संदेश निलेश राणे यांनी यावेळी दिला.





