योगासन वर्ग अजूनही बंदच

जीम, योगासनात दुजाभाव का? नागरिकांचा सवाल
परवानगी देण्याची मागणी
पुणे – हॉटेल्सपाठोपाठ राज्यातील जीम्सला (व्यायामशाळा) सुरू करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. येत्या दसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्यासह राज्यातील जीम सुरू होणार आहेत. असे असले, तरी योगासन वर्गांबाबत मात्र कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे जीम व योगासनामध्ये दुजाभाव का केला जात आहे, असा सवाल योगासन वर्ग चालक आणि उपस्थित केला जात आहे.
गेल्या सहा-सात महिन्यांपासून काही योगासन वर्गांनी ऑनलाइन वर्ग घेण्यास सुरूवात केली आहे. मात्र, त्यांना पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते.
योगासनामध्ये कोणत्याही व्यायाम साहित्याचा संबंध येत नसून सर्व व्यायामप्रकार वैयक्तिकरित्या करायचे असतात. तरीही वर्गांना परवानगी मिळाली नसल्याने योगप्रेमी नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे.
नागरिकांना योगासने प्रत्यक्ष शिकवणे व ऑनलाइन शिकवणे यामध्ये बऱ्याच प्रमाणात फरक आहे. पुण्यातील 90 टक्क्यांहून अधिक योगासन प्रेमींना असे वाटते, की योगासना वर्ग तातडीने सुरू करावेत. मात्र, नोव्हेंबरमध्ये दिवाळी असल्याने नागरिक बाहेरगावी फिरायला जातात व योगासन वर्गाला दांडी मारतात. त्यामुळे जानेवारीपासून वर्ग सुरू केल्यास नव्या दमाने सर्व जण रुजू होतील. योगासन वर्ग सुरू करावेत, याबाबत माझे दुमत नाही.
– साधना काळे, योगासन वर्गचालक





