Yoga Mantra: फक्त ॲसिडिटीपासून मुक्ती नाही तर वेट लॉसमध्येही मदत करते हलासन, हे आहेत फायदे

एक शयनस्थितीतील आसन आहे. हल म्हणजे नांगर आणि नांगरासारखी शरीराची अवस्था करायची म्हणजे हलासन. हलासनाचे अनेक प्रकार आहेत. विशेषतः विस्तृतपाद आणि कर्णपिडनासन हे केले जातात. हलासनामध्ये दोन्ही हात शयनस्थित ठेवून फक्त पाय जमिनीला टेकवण्याची क्रिया केली जाते.
यामध्ये पाय डोक्यापासून शक्य तेवढे लांब न्यावेत गुडघे सरळ ठेवून दोन्ही पाय डोक्याच्या जवळ जवळ आणावेत. पाय उचलले जातात आणि कंबरसुद्धा जमिनीच्या दिशेने खाली खाली येत राहते. या प्रथम प्रकारात काही वेळा छातीवरती प्रेशर व दाब येण्याची शक्यता असते म्हणून शक्यतो योगतज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली हलासनाचा पहिला प्रकार करावा. पायाचे अंगठे हे जमिनीला टेकताच पूर्णपणे गुडघे ताठ हवेत. जे सुरुवातीला गुडघ्याची लवचिकता कमी असल्यामुळे जमत नाही. नुसते हवेतच डोक्यापर्यंतच पाय राहतात. पण सरावाने जमू शकते.
हलासनाच्या दुसऱ्या प्रकारात दोन्ही हाताची बोटे एकमेकात अडकवून डोक्याच्या वरच्या बाजूस डोक्याला टेकवून जमिनीला ठेवावीत व पाय जास्तीत जास्त लांब न्यावेत. थोडा वेळ स्थिर राहावे. पाय गुडघ्यात न वाकवता डोक्याच्या जवळजवळ आणावेत. कंबर जमिनीच्या दिशेने न्यावी. पाय उचलले जातात. ही क्रिया झेपेल एवढीच करावी. हलासनाच्या तिसऱ्या प्रकारात श्वास घेत घेत दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता सरळपणे जमिनीला टेकवावेत. शक्य झाल्यास कानांजवळ न्यावेत आणि पावले जमिनीला टेकवावीत. स्थिरता राखावी.
हलासनाच्या चौथ्या प्रकारात म्हणजेच विस्तृतपाद हलासनात श्वास घेत घेत दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता जमिनीला टेकवावे. मग दोन्ही हाताने दोन्ही पायाचे अंगठे पकडावे. कंबर जास्तीत जास्त जमिनीकडे खाली खाली जाईल. पाय फाकवून, पायाचे अंगठे पकडून पाय डोक्यापासून लांबही नेता येतात. अंगठे पकडल्यामुळे एक प्रकारचा आधार मिळतो. या सर्व प्रकारच्या हलासनाचे अनेक फायदे आहेत. प्रत्येक क्रिया ही श्वास घेत पाय वाकवण्याची करावी. आसनस्थिती घेतल्यावर संथ श्वसन करणे आवश्यक.
या आसनाचे सराव नवोदितांनी मार्गदर्शकाशिवाय करू नयेत. पाठीचे सर्व स्नायू मूत्रपिंड, ऍड्रिनल ग्रंथी, यकृत, प्लीहा, स्वादूपिंड, या सर्व अवयवांना हे आसन नियमित केल्यामुळे चांगला मसाज होतो. त्यामुळे त्याची कार्यक्षमता वाढते. तसेच श्वास -पटलाची देखील कार्यक्षमता वाढते म्हणून दमेकऱ्यांनी योगतज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली आसन रोज करावे. ज्यांना मधुमेह आहे, बद्धकोष्ठता आहे, आर्तवदोष आहे तसेच अग्निमांद्य व मूत्रसंस्थेसंबधी दोष आहेत अशांनी हे आसन नियमित करावे. त्याचे फायदे नक्कीच होतात.हर्निया स्लिडिस्क, सायटिका, उच्चरक्तदाब, मानेचा संधिवात, पाठीच्या कण्याची दुखणी वगैरे विकार असलेल्यांनी हे आसन करू नये.





