Yoga During Periods: मासिक पाळीच्या काळात योग करावा की नाही, याबाबत अनेक गैरसमज आजही समाजात आहेत. काही जणांच्या मते या दिवसांत पूर्ण विश्रांती घ्यावी आणि कोणतीही शारीरिक हालचाल टाळावी. मात्र तज्ज्ञांचे मत वेगळे आहे. National Health Mission च्या अलीकडील सूचनांनुसार, हलका आणि योग्य प्रकारचा योग पाळीदरम्यान फायदेशीर ठरू शकतो. पाळीच्या वेळी शरीरात हार्मोन्समध्ये मोठे बदल होतात. गर्भाशयाच्या स्नायूंमध्ये आकुंचन-प्रसरण होत असल्यामुळे पोटात दुखणे, कंबरदुखी, थकवा आणि चिडचिड अशी लक्षणे दिसतात. अशावेळी जड व्यायाम टाळणे योग्य असले, तरी सौम्य योगासन शरीराला आराम देऊ शकतात. हलक्या हालचालींमुळे रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायूंवरील ताण कमी होतो. योगामुळे पोट आणि पाठीच्या खालच्या भागातील स्नायू सैल होतात. त्यामुळे पाळीतील वेदना आणि कळा कमी होऊ शकतात. यासोबतच हार्मोनल बदलांमुळे होणारे मूड स्विंग्स आणि ताणही कमी होण्यास मदत होते. नियमित आणि सौम्य योग केल्यास या दिवसांत शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते. तज्ज्ञांच्या मते, पाळीदरम्यान काही विशिष्ट आसने सुरक्षित मानली जातात. बालासन – पाठीच्या खालच्या भागातील वेदना कमी करण्यास उपयुक्त. सुप्त बद्धकोणासन – पेल्विक भागातील ताण कमी करते. मार्जारीआसन – कंबर आणि पाठीसाठी फायदेशीर, लवचिकता वाढवते. विपरीत करणी – पायातील सूज आणि थकवा कमी करण्यास मदत करते. शवासन – मन शांत ठेवण्यासाठी आणि खोल श्वासासाठी उत्तम. Yoga During Periods मात्र, काही आसने या काळात टाळणे आवश्यक आहे. विशेषतः डोक्याखाली शरीर उलटे येणारी आसने, जसे शीर्षासन किंवा सर्वांगासन, करू नयेत. अशा इन्व्हर्जन प्रकारातील आसनांमुळे शरीरावर अनावश्यक ताण येऊ शकतो. तसेच रक्तस्त्राव जास्त प्रमाणात होत असेल किंवा वेदना असह्य असतील, तर योग करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. योग करताना काही गोष्टींची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. योग नेहमी रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर किमान दोन-तीन तासांनी करावा. शरीराला जास्त ताण देऊ नये आणि आपल्या क्षमतेबाहेर जाऊन स्ट्रेचिंग करू नये. प्रत्येक स्त्रीचे शरीर वेगळे असते, त्यामुळे स्वतःच्या प्रकृतीनुसार निर्णय घ्यावा. एकूणच, मासिक पाळी ही आजारपण नसून नैसर्गिक प्रक्रिया आहे. योग्य माहिती आणि काळजी घेतल्यास हलका योग या काळात औषधासारखा उपयोगी ठरू शकतो. मात्र अतिरेक टाळणे आणि शरीराचे संकेत ओळखणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे.