होय, मी विनाहेल्मेट, ट्रिपल सीट गाडी चालविली

शिवाजीनगर वाहतूक कोर्टातील चित्र, दररोज गुन्हा कबूल करणाऱ्यांची संख्या मोठी
पुणे – अगदी विशीतील कोवळा तरूण. चेहऱ्यावर घाबरल्याची छटा. त्याचे पाऊल वाहतूक न्यायालयाच्या कक्षाजवळ पोहोचते, तो थोडासा थांबतो. आत प्रवेश करताच सर्वांचे लक्ष त्याच्यावर. न्यायाधीशांच्या दिशेने बघत थरथरत्या आवाजात म्हणतो, साहेब… मी विनाहेल्मेट गाडी चालवली. माझी चूक झाली. त्याचा आवाज शांत कोर्टात घुमतो आणि क्षणभर स्तब्धता पसरते. न्यायाधीशांनी दंडाची रक्कम सांगितली की तो मान हळूच झुकवत बाहेर येतो. जणू सुटकेचा नि लाजेचा एकत्र अनुभव घेऊन. हे चित्र वाहतूक न्यायालयात अशा प्रकरणात दररोज दिसते.
शहरासह जिल्ह्यातील वाहन चालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याने चूक कबुल करणाऱ्या चालकांची संख्याही लक्षणीय वाढत आहे. शिवाजीगर वाहतूक न्यायालयात दररोज सरासरी ५ ते १० वाहनचालक आपला गुन्हा कबूल करतात. वाहतूक शाखेकडून शहरभर राबविण्यात येणाऱ्या मोहिमा आणि तपासण्यांसह सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झालेल्या वाहनचालकांमुळे न्यायालयात त्यांची रोज मोठी उपस्थिती असते. यामध्ये, विनाहेल्मेट वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, कागदपत्रे अपूर्ण असणे, दुचाकीवर तिघे बसणे तसेच ड्रंक अॅण्ड ड्राईव्हसारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
अशी असते प्रक्रीया
वाहनावर दंड लावल्यानंतर जागेवर दंड भरण्याची तरतूद आहे. मात्र, वाहनचालकाने जागेवर दंड भरला नाही तर पोलिसांकडून खटला दाखल होतो. त्यानंतर समन्स पाठविल्यावर हजर राहून न्यायालयीन प्रक्रिया पार पाडावी लागते. काहीजण न्यायालयात हजर होतात. यावेळी, विनाहेल्मेट, कागदपत्रे नसणे आदी गुन्हयात सवलत मिळते. मात्र, ड्रॅंक ॲण्ड ड्राईव्हसारख्या गंभीर गुन्हयात ती मिळत नाही. यावेळी, न्यायालय जो दंडाचे शुल्क सांगेल ते भरावे लागते. त्यानंतर, खटला निकाली निघतो.
पाच महिन्यांतील चित्र
महिना गुन्हा कबुल केलेले
जून 190
जुलै 360
ऑगस्ट 139
सप्टेबर. 308
ऑक्टोबर .203
वाहतूक नियमांचे उल्लंघन हे दंड भरून संपणारे प्रकरण नाही. विशेषतः ड्रंक-ड्राईव्हसारख्या प्रकरणांत आरोपी स्वतःची आणि इतरांचीही जीवितहानी घडवू शकतात. नियम पाळणे ही जबाबदारी नसून ते सामाजिक कर्तव्यही आहे. हे रोखण्यासाठी कठोर शिक्षा आणि जनजागृती दोन्ही तितकेच आवश्यक आहेत.
– ॲड. सचिन हिंगणेकर, माजी उपाध्यक्ष, पुणे बार असोसिएशन





