Celebrities who died in 2024 : 2024 मध्ये ‘या’ लोकप्रिय कलाकारांनी घेतला जगाचा निरोप

मुंबई : 2024 हे वर्ष सरत आले आहे. या वर्षात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या. या वर्षात अनेक नवीन चित्रपट, वेब सीरिज, मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले; तर काहींचे घटस्फोट झाल्याचेदेखील झाले. तसेच अनेक लोकप्रिय कलाकारांनी जगाचा निरोपही घेतला. त्यांच्या निधानामुळे कलाविश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. या कलाकारांबद्दल जाणून घेऊयात…
१) सुहानी भटनागर
आमिर खानच्या ‘दंगल’ या गाजलेल्या चित्रपटात लहानपणीची बबिता साकारणारी अभिनेत्री म्हणजे सुहानी भटनागर हिचे १६ फेब्रुवारी २०२४ ला निधन झाले. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. अभिनेत्रीचा पाय फ्रॅक्चर झाला होता आणि उपचारादरम्यान चालू असलेल्या औषधांचा तिच्या शरीरावर दुष्परिणाम झाला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.
२) विकास सेठी
क्योंकि सांस भी कभी बहू थी या मालिकेतून घराघरांत पोहोचलेले अभिनेते विकास सेठी यांचे वयाच्या ४८ व्या वर्षी निधन झाले. ८ सप्टेंबर २०२४ ला त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.
३) ऋतुराज सिंह
टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक अशी ऋतुराज सिंह यांची ओळख होती. बनेगी अपनी बात, घर एक मंदिर, अनुपमा अशा अनेक मालिकांमध्ये त्यांनी काम केले होते. त्यांनी मोठ्या प्रमाणात नकारात्मक भूमिका साकारल्या होत्या. त्यांचेदेखील हार्ट अटॅकने निधन झाले. २० फेब्रुवारी २०२४ ला त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला.
४) अतुल परचुरे
अतुल परचुरेंचे १४ ऑक्टोबर २०२४ ला निधन झाले. दीर्घकाळापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांनी ‘नवरा माझा नवसाचा’, ‘बिल्लू’, ‘यकीन’, ‘आम्ही सातपुते’, ‘सून लाडकी सासरची’ आणि २०२४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ अशा अनेक मराठीसह हिंदी चित्रपटांत काम करून लोकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते.
५) नितीन चौहान
‘क्राइम पेट्रोल’ व ‘स्प्लिट्सव्हिला’ अशा शोंमध्ये काम करणाऱ्या अभिनेता नितीन चौहानने वयाच्या ३५ व्या वर्षी ६ नोव्हेंबर २०२४ ला जगाचा निरोप घेतला. त्याने स्वत:च्याच घरात गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला. गेल्या काही वर्षांपासून तो नैराश्याचा सामना करीत होता.
६) डॉली सोही
‘झनक’ या लोकप्रिय कार्यक्रमात दिसणारी अभिनेत्री डॉली सोहीचेदेखील या वर्षी निधन झाले. सर्व्हिकल कॅन्सरबरोबर लढा देणाऱ्या अभिनेत्रीचे वयाच्या ४८ व्या वर्षी ८ मार्च २०२४ ला निधन झाले. त्याबरोबरच डॉली सोहीची बहीण अमनदीप सोही हिचेही कावीळ झाल्यामुळे निधन झाले. दोघींचे ४८ तासांच्या अंतराने निधन झाले होते.
७) कविता चौधरी
‘उडान’ या लोकप्रिय मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्री कविता चौधरी यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.





