Year Ender 2024 : वनडे क्रिकेटमध्ये ‘या’ वर्षी सर्वाधिक धावा करणारे 5 भारतीय फलंदाज, यादीत अक्षर अन् वॉशिंग्टनचा समावेश…

India’s highest run-scorers in ODIs in 2024 : साल 2024 हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी संमिश्र ठरले. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये टीम इंडियाने सर्वाधिक यश मिळवले. वेस्ट इंडिजच्या भूमीवर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघ टी-20 विश्वविजेता ठरला. यासोबतच टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघाला त्यांच्याच भूमीवर पराभूत केले. मात्र, हे वर्ष एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी काही खास नव्हते.
साल 2024 मध्ये टीम इंडियाला 50 ओव्हरच्या फॉरमॅटमध्ये जास्त खेळण्याची संधी मिळाली नाही. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेतही भारतीय संघाला 2-0 ने पराभवाला सामोरे जावे लागले होते. या वर्षी वनडे क्रिकेटमध्ये भारताच्या कोणत्या पाच फलंदाजांनी सर्वाधिक धावा केल्या आहेत ते जाणून घेऊया….
1. रोहित शर्मा : यावर्षी भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या बॅटमधून सर्वाधिक धावा आल्या. रोहितने 3 सामन्यात 52 च्या सरासरीने आणि 141 च्या स्ट्राईक रेटने 157 धावा केल्या. या काळात रोहितची सर्वाधिक धावसंख्या 64 होती. रोहित या फॉरमॅटमध्ये नेहमीच यशस्वी ठरला आहे.
2. अक्षर पटेल : 2024 मध्ये, टीम इंडियासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत अक्षर पटेल दुसऱ्या क्रमांकावर आहे. अक्षरने 3 सामन्यात 26 च्या सरासरीने आणि 73 च्या स्ट्राईक रेटने 79 धावा केल्या. मात्र, अक्षरने यावर्षी वनडेमध्ये एकही शतक किंवा अर्धशतक झळकावले नाही.
3. विराट कोहली : मागील वर्षी म्हणजेच 2023 साली एकदिवसीय क्रिकेटमध्ये भरपूर धावा करणारा विराट कोहली यावर्षी 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये काही खास कमाल दाखवू शकला नाही. तथापि, असे असूनही, 2024 मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या स्थानावर राहिला. कोहलीने 3 सामन्यात 19 च्या सरासरीने आणि 84 च्या स्ट्राईक रेटने 58 धावा केल्या आहेत.
4. शुभमन गिल : शुभमन गिलसाठी हे वर्ष तिन्ही फॉरमॅटमध्ये कमालीचे ठरले. मात्र, गिलला वनडे फॉरमॅटमध्ये फारसे यश मिळाले नाही. या वर्षी खेळल्या गेलेल्या 3 एकदिवसीय सामन्यांमध्ये, गिलने 19 च्या सरासरीने आणि 61 च्या स्ट्राइक रेटने केवळ 57 धावा केल्या आहेत.
5. वॉशिंग्टन सुंदर : एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत वॉशिंग्टन सुंदरचे नाव पाचव्या स्थानावर आहे. सुंदरने 2024 मध्ये खेळल्या गेलेल्या 3 सामन्यात एकूण 50 धावा केल्या असून त्याची फलंदाजीची सरासरी 16 आणि स्ट्राईक रेट 72 इतका होता.





