यवत : चारचाकी गाड्यांचे सायलन्सर चोरी करणारे जेरबंद

यवत (प्रतिनिधी) – यवत (ता.दौंड) येथे भुलेश्वर मार्केट येथे सतीश द्वारकादास लोंढे (वय ४८ वर्ष ) यांनी श्री भुलेश्वर गॅस एजन्सी समोर लावलेला त्यांचा मारुती सुझुकी कॅरी मॉडेलच्या टेम्पोचा (एम.एच. ४२.बीएफ. ००५४) सायलेन्सर कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेलेबाबत यवत पोलीस ठाण्यात (दि.२१) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाला गोपनीय बातमीदाराच्या आधारे (दि. ०३) रोजी माहिती मिळाली की, गणेशनगर, धायरी येथील रोहित अडसूळ याने त्याचा साथीदार गौरव होगले यांनी मिळून सायलेन्सर चोरी केला आहे. सदर पोलीस पथकाने गणेशनगर धायरी येथून रोहित रंगनाथ अडसूळ(वय १९ रा.गणेशनगर धायरी मुळ रा.तडवळ ता.जि.उस्मानाबाद) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा मित्र गौरव होगले याचे सोबत केला असल्याची कबुली दिली व चोरून आणलेले सायलेन्सर हडपसर येथील भंगार व्यावसायिक तसब्बूर युसूफ मलिक(सध्या रा.रामटेकडी मूळ रा. मुंडली ता.जि मेरठ राज्य उत्तर प्रदेश)याला विकले असल्याचे सांगितले असता त्यासही सदर गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर आरोपींनी यवत,सासवड,जेजुरी या परिसरातील एकूण ४ गुन्हे केले असल्याचे सांगितले असून सदर गुन्हयातील दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर आरोपीस प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी दौंड यांनी (दि१०)रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस पोलीस हवालदार कृष्णा कानगुडे, निलेश कदम, गुरू गायकवाड, पोलीस नाईक अक्षय यादव, गणेश कुतवळ सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सचिन गायकवाड, पोलीस मित्र निलेश चव्हाण यांनी केली आहे.





