यशश्री शिंदे हत्याकांडात मोठा ट्विस्ट ! पोलिसांच्या हाती लागला ‘हा’ महत्वाचा पुरावा

नवी मुंबई : काही दिवसांपूर्वी उरणमध्ये घडलेल्या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. यामध्ये यशश्री शिंदे नावाच्या तरुणीची अत्यंत भयानक पद्धतीने हत्या करण्यात आली होती. यशश्री बेपत्ता झाली होती, कुटुंबीयांकडून तिचा शोध घेण्यात आला त्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळच्या सुमारास उरणमध्ये छिन्नविन्न अवस्थेमध्ये तिचा मृतदेह आढळून आला होता. उरण तालुक्यातील कोटनाका येथील पेट्रोल पंपाजवळ असलेल्या निर्जन रस्त्यावर तिचा मृतदेह आढळून आला होता. दाऊद शेख नावाच्या व्यक्तीने तिची हत्या केली होती. या प्रकरणात आता एक अपडेट समोर आली आहे.
यशश्री शिंदे प्रकरणात नवीन ट्विस्ट?
मृत यशश्री शिंदेचा मोबाईल पोलिसांच्या हाती लागला आहे. रांजनपाडा रेल्वे स्टेशन परिसरात यशश्रीचा मोबाईल पोलिसांना मिळाला. हा मोबाईल पाण्यानं भिजला आहे, त्यामुळे आता पोलीस ठाण्यात येऊन फॉरेन्सिक टीम या मोबाईलची दुरुस्ती करणार आहे. या मोबाईलमध्ये यशश्री आणि दाऊद यांच्यात झालेल्या संभाषणाचं रेकॉर्ड असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र यशश्रीचा मोबाईल पूर्णपणे दुरुस्त झाल्याशिवाय त्यामध्ये काय आहे हे समजू शकणार नाही. सापडलेल्या मोबाईलच्या मदतीने या प्रकरणात आणखी काही गोष्टीचे खुलासे होण्याची शक्यता आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
काय घडले नेमके?
प्रेमात धोका मिळाल्याचा राग आणि सूडाने पेटलेल्या आरोपीनं यशश्रीला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली होती. यशश्री शिंदे भेटायला येत नसल्याने आरोपी दाऊद शेख चिडला होता. तिने लग्नाला नकार दिल्याने त्याच्या रागात भर पडली. सोबत येण्यासाठी तो तगादा लावत होता. त्याचा तगदा आणि सतत होण्याऱ्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून तिने एकदा भेटून सगळा विषय संपवण्याचा निर्णय घेतला. आरोपी बदला घेण्यासाठी पूर्ण तयारीनं आला होता. तिथे त्यांच्यात वाद सुरू झाले आणि राग अनावर झाल्याने त्याने चाकूने सपासप वार केले आणि तिला संपवलं.हत्येच्या दिवशी यशस्वी ने तिच्या एका मित्राला फोन करून मदत मागितली मात्र नेटवर्क नसल्यामुळे दोघांचा संपर्क होऊ शकला नाही. हत्येनंतर दाऊद यशश्रीचा मोबाईल आणि हत्यार घेऊन कळंबोली येथून कर्नाटकची बस पकडून गावी निघून गेला. यानंतर पोलिसांनी आरोपी दाऊदला कर्नाटकमधून अटक केली.





