Yashasvi Jaiswal Controversy : जैस्वालच्या एलबीडब्ल्यूवरुन वाद; पंचांशी हुज्जत घातल्याने मैदानावर तणाव

Yashasvi Jaiswal’s LBW Controversy : भारत अ संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावरील दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात खेळत आहे. नाणेफेक जिंकून इंग्लंडने भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यानंतर पहिल्या दिवसअखेर भारताने ७ बाद ३१९ धावा केल्या. केएल राहुलच्या शानदार शतकाने भारताचा डाव सावरला आणि मोठी धावसंख्या उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दुसरीकडे, यशस्वी जैस्वाल पुन्हा अपयशी ठरला आणि बाद झाल्यानंतर मैदानावर पंचांशी वाद घालताना दिसला.
यशस्वी जैस्वालच्या एलबीडब्ल्यूवरुन झाला वाद –
यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल ही सलामीची जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात आली. दोघांनीही सुरुवातीच्या षटकांमध्ये सावधगिरीने खेळ केला ज्यामध्ये जैस्वालने २६ चेंडूंचा सामना केला आणि क्रिस वोक्सच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू होण्यापूर्वी २ चौकारांसह १७ धावा केल्या. जेव्हा पंचांनी जैस्वालला एलबीडब्ल्यू घोषित केले, तेव्हा तो या निर्णयाबद्दल खूप संतप्त दिसत होता. ज्यामध्ये तो काही वेळ त्याच्या जागी उभा राहिला आणि पंचांकडे पाहत राहिला आणि काही वेळ असेच उभे राहिल्यानंतर, तो रागाने पॅव्हेलियनकडे निघून गेला.
Jaiswal lbw 17 to Woakes … not sure he necessarily agreed with the decision pic.twitter.com/b3w7dHP5uA
— Ali Martin (@Cricket_Ali) June 6, 2025
कसोटी मालिकेसाठी जैस्वालचा फॉर्म भारतासाठी महत्त्वाचा –
यशस्वी जैस्वालने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून, त्याने सातत्याने उत्तम कामगिरी दाखवली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही जैस्वालने आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले होते. आता त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच, यशस्वी इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळणार आहे, जिथे स्विंग गोलंदाजीचा सामना करणे कोणत्याही फलंदाजासाठी सोपे काम नाही. अशा परिस्थितीत, जैस्वाल या आव्हानाला कसे तोंड देतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. त्याच वेळी, कसोटी मालिकेत यशस्वीची कामगिरी टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. कसोटी मालिकेला २० जूनपासून सुरुवात होणार आहे.
हेही वाचा – French Open 2025 : जोकोविचचा फ्रेंच ओपनमध्ये दारुण पराभव: यानिक सिनरची अंतिम फेरीत धडक
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ :
शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टिरक्षक), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.





